विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांची मागणी
पोलादपूर, अलिबाग ः प्रतिनिधी
कोकणाला राज्य सरकारने सापत्नपणाची वागणूक दिली आहे. त्यामुळे आज कोकणावर संकट ओढवल्यामुळे जो धक्का बसला आहे त्याकडे राज्य सरकारने पाठ दाखवली तर कोकणची जनता कोणालाही माफ करणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कोकणाला उभारी देण्यासाठी ज्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी घेऊ. आमच्या कोकणच्या माणसाला पाठबळ देऊन राज्य सरकारने पुन्हा उभे करावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी (दि. 9) येथे केले.
निसर्ग चक्रीवादळाचा रत्नागिरीला मोठा फटका बसला असून श्रीवर्धनही प्रभावित झाले. या पार्श्वभूमीवर श्रीवर्धनमधील उद्ध्वस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार दरेकर यांनी या ठिकाणचा दौरा केला. त्या वेळी ते बोलत होते.
या दौर्यात भाई गिरकर, आमदार प्रसाद लाड, आमदार पराग अळवणी, भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी उपस्थित होते. दरम्यान, श्रीवर्धन प्रांत-तहसीलदार कार्यालयात महसूल, पोलीस, कृषी, वैद्यकीय, विद्युत वितरण, ग्रामविकास अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्री पहिल्यांदा कुठल्यातरी जिल्ह्यात आले ही समाधानाची बाब आहे. रायगडमध्ये माझ्या दौर्यानंतर मुख्यमंत्री आले व तुटपुंजी का होईना मदत जाहीर केली याचे समाधान वाटते. नुकताच आम्ही रत्नागिरीचा दौरा केला. तोच दौरा शरद पवार करणार आहेत. आमच्या दौर्यामुळे त्यांना जाग आली. कदाचित आमचा दौरा झाला नसता तर कोणीही फिरकले नसते, अशी टीका आमदार दरेकर यांनी केली. फक्त दौरा करून चालणार नाही. त्या माध्यमातून जनतेला दिलासा मिळायला हवा. त्यामुळे आमच्या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. शरद पवार व मुख्यमंत्री ठाकरे वेगवेगळ्या दौर्यावर आहेत. सरकारमध्ये एकत्र आहेत मग वेगळे दौरे का, असा प्रश्न आमदार दरेकर यांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडी सरकारमधून मदत व पुनर्वसनमंत्री वडेट्टीवार काल दौर्यावर आले. एकनाथ शिंदे यांनी वेगळा दौरा केला. पवार आज दौर्यावर असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरी दौर्यावर आहेत. अशा प्रकारे वेगवेगळे जाण्याऐवजी मदत व पुनर्वसन खाते, बाधित जिल्ह्याचे पालकमंत्री, सरकार एकत्र आले असते तर लोकांना न्याय देता आला असता. या दौर्यांत समन्वय नाही तर मदत देण्यात किती समन्वय राहील हा महत्त्वाचा मुद्दा आहे, असा टोला आमदार दरेकर यांनी लगावला.
प्रशासनाने निसर्ग चक्रीवादळापासून सतर्क करण्यासाठी चांगली भूमिका घेतली. त्यामुळे जीवितहानी कमी झाली. आता वादळाचे पंचनामे केल्यानंतरची सरकारची भूमिका संवेदनहीन आहे. कारण पुनर्वसनासाठी दिलेली 45 कोटी किंवा 48 कोटी मदत एका गावाच्या पुनर्वसनासाठीही पुरेशी नाही. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या नियमाप्रमाणे सरकारने 91 हजार रुपयांची मदत केली. हे उपकार नाही किंवा सरकारची मेहरबानी नाही. कारण एसडीआरएफच्या नियमाप्रमाणे सरकारने 91 हजार 500 देणे हे नियमात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार सरकार म्हणून काही वेगळे करीत नाही.
केंद्र सरकारचे (एनडीआरएफ) राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या माध्यमातून जे पैसे येतात त्यातून नियमाप्रमाणे मदत दिली. आमच्या म्हणण्यानुसार त्यात आणखी तीनपट भर घालून राज्य शासनाने प्रत्येकी तीन लाख रुपये द्यावे, अशी मागणीही आमदार प्रवीण दरेकर यांनी या वेळी केली. विजेचे पोल लवकरात लवकर दुरुस्त व्हावे यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत बोलून पाठपुरावा करतोय. आमचे आमदार कोकणचा दौरा करताहेत. अनेक आमदार कोकणात ठाण मांडून बसले आहेत.
सर्वांत मोठे सेवाकार्य भाजपच्या वतीने सुरू आहे. काल आम्ही अंजर्ले गावी गेलो. तिकडे दोन महिलांनी पाणी योजना बंद असल्याचे सांगितले. तेव्हा दोन जनरेटर तत्काळ देण्याचे आश्वासन दिले. यासाठी सरकारवर अवलंबून राहिलो नाही. दोन जनरेटरपैकी एक जनरेटर रवाना झाला असून दुसरा लवकरच पोहचेल. मानवतेच्या भावनेतून आमच्या पक्षाची मोठी सामग्री जनतेसाठी वापरली जात आहे. सरकारने आता कोकणाला झुकते माप दिले पाहिजे. कोकणच्या तोंडाला पाने पुसून चालणार नाही. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी भाजपच्या माध्यमातून 16 ट्रक पत्रे आले आहेत. सौरउर्जेवर चालणार्या दिव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आणखी ज्या काही गरजा आहेत त्याही पूर्ण करण्याचे काम करणार असल्याचे आमदार प्रवीण दरेकर यांनी या वेळी स्पष्ट केले.