Breaking News

निसर्ग चक्रीवादळाने हिरावला पशुपक्ष्यांचा निवारा; अन्नाच्या शोधात वन्यप्राणी शिरले मानवी वस्तीत

पाली ः प्रतिनिधी

शतकातील सर्वात मोठे आणि भयाण चक्रीवादळ कोकणाने जवळून पाहिले. निसर्गाच्या या प्रकोपातून अनेक दशके सावरणे कठीण आहे. कोट्यवधींची वित्तहानी व त्याजोडीला झालेली मनुष्यहानीदेखील हादरवून टाकणारी आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका मानवजातीलाच नाही, तर येथील पशुपक्ष्यांनाही बसला आहे. आजघडीला पधुधन मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले. वादळात मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने यावर अधिवास करणार्‍या अनेक जातीच्या पशुपक्ष्यांची निवासस्थाने नष्ट झाली आहेत. नुकत्याच जन्माला आलेली पक्ष्यांची पिल्ले, त्यांची घरटी गायब झाली आहेत. या वादळाने पशुपक्ष्यांच्या निवार्‍यासह जगण्याचा सहारादेखील हरपल्याने भविष्यात याचे दुरगामी परिणाम येथील वन्यजीवांवर पडतील, असे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.

अन्नाच्या शोधात वन्यप्राणी मानवीवस्तीत दाखल होत आहेत. सुधागड तालुक्यातील जंगल भागात अनेक वृक्ष उन्मळून पडले. पशुपक्ष्यांवर मोठे संकट ओढवले. मुरूड समुद्र किनार्‍यावरील दरबार रोड येथे वटवाघळांची मोठी वसाहत होती. या ठिकाणची झाडे उन्मळून पडल्याने ही वटवाघळे मुरूड शहरभर घिरट्या घालताना दिसत आहेत. फणसाड वन्यजीव अभयारण्यातही झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण जास्त आहे. उंच झाडावर घरटी तयार करून राहणारे गिधाड, घुबड, ससाना यांसारख्या पक्ष्यांची घरटी वादळात उडून गेली आहेत. गिधाड संवर्धनासाठी काम करणार्‍या सिस्केप या संघटनेचे 22 सदस्य सध्या श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यात किती दुर्मीळ पक्ष्यांची घरटी नाहीशी झाली याची पाहणी करीत आहेत. श्रीवर्धन येथील दाबकआळी, गुरवआळी या ठिकाणी उंच झाडांवरील गिधाडांची 28 घरटी नाहीशी झाली आहेत. श्रीवर्धनमधील पेशवेआळी, महेश्वरआळी, गायगोठण, चौकर पाखाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडल्याने पोपट, कोकीळ, घुबड यांसारख्या पक्ष्यांबरोबरच घोडपड, शेकरु, माकड या सस्तन प्राण्यांचीही राहण्याची ठिकाणे गायब झाली आहेत.

श्रीवर्धनच्या प्रांताधिकार्‍यांनी आमच्या टीमला श्रीवर्धनमध्ये रेस्क्यू ऑपरेशनसाठी नियुक्त केले होते. येथे जुनी झाडे उन्मळून पडली आहेत. या झाडांवरील ढोल्या, भोकं, फटी अशा ठिकाणी हे प्राणी-पक्षी राहत होते. पाहणी करताना पक्षी मरून पडलेले दिसून आले. जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करून जंगलात सोडण्याचे काम सुरू आहे. जंगलातील पशुपक्ष्यांवरही विपरीत परिणाम झाला आहे. विशेषत: दुर्मीळ होत चाललेल्या गिधाड संवर्धनास याचा फटका बसू शकतो. अन्य पक्ष्यांचीही संख्या या वादळानंतर कमी झालेली असेल.  -प्रेमसागर मेस्त्री, सिस्केप, गिधाड संवर्धन संस्था

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply