नागोठणे ः प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या चेहर्यावर मास्क लावावा, असे शासनाकडून बंधनकारक करण्यात आले आहे, मात्र नागोठणेत या आदेशाला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येते. 95 टक्के नागरिक मास्क न लावताच गावभर फिरत असल्याचे चित्र दिसत आहे.
नागोठणे शहरात साधारणतः अडीच महिने उलटूनही अनेकांच्या चेहर्याला अद्यापही मास्कचा स्पर्शच झाला नसल्याचे उघड होत आहे. काही जण बाजारहाट करण्यासाठी किंवा इतर कामासाठी बाहेर पडताना मास्क लावत नसून विशेष म्हणजे अनेक लहानमोठे दुकानदार तसेच फेरीवालेही मास्क न लावता आपले व्यवसाय करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी येथील ग्रामपंचायतीकडून मास्क न लावणार्यांकडून दंड आकारण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती, परंतु अनेकांवर दंडात्मक कारवाईनंतर ही मोहीम थंडावली. 95 टक्के नागरिक मास्कविना फिरत असून त्यात सुशिक्षित माणसांचाच भरणा अधिक आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून कामानिमित्त शहरात येणार्या नवीन नागरिकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. परिणामी नागोठणे ग्रामपंचायत व पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेऊन मास्क न लावता भटकंती करणार्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी स्नानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.