माणगाव ः प्रतिनिधी
संकटांशी जिद्दीने सामना करण्याची पक्ष्यांची अनोखी पद्धत असून 3 जूनला रायगडात आलेल्या निसर्ग चक्रीवादळात असेच एक निरीक्षण समोर आले आहे. हवामानाचे अचूक अंदाज सांगणारे पशुपक्षी नैसर्गिक आपत्तींना धैर्याने तोंड देत असल्याचे दिसून आले. निसर्ग चक्रीवादळाचे वारे ताशी 120 किमी वेगाने वाहत होते. या वादळात घरांचे, इमारतींचे व वृक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. झाडे पडत होती. झाडांचे शेंडे जमिनीला टेकत होते. उंच वनस्पती बांबू, नारळ यांचे शेंडे जमिनीला टेकत होते. पावसाळा असल्याने अनेक पक्ष्यांनी झाडांच्या शेंड्यांवर घरटी बांधली आहेत. वादळाच्या तडाख्यात उंच झाडे वाकत असताना घरट्यातील पक्षी मात्र आपापल्या घरट्यात जिद्दीने चिकटून बसल्याचे दिसून आले. जोपर्यंत झाड उन्मळून फांदीवरील घरटे पडत नाही तोपर्यंत हे पक्षी भयंकर वादळातही घरट्यात तीन-चार तास बसून असल्याचे दिसून आले आहे.
पक्ष्यांचा विणीचा हंगाम असल्याने व पावसात पुन्हा दुसरे घरटे बांधता येणे शक्य नाही हे पक्षी जाणतात. घरट्यासाठी आता आवश्यक गवत, पेंढा, काडी व ठरावीक ऊब देणार्या नैसर्गिक वस्तू मिळणार नसल्याने पक्षी आहेत त्याच घरट्यात वादळातही राहिले. त्यांनी आपली घरटी सोडली नाहीत. तसेच काही जातीतील पक्ष्यांची पिल्ले वादळात काही न समजल्याने एकाच ठिकाणी स्थिर बसून राहिली होती, असे पक्षी निरीक्षकांचे निरीक्षण आहे. संकटात आपले घरटे न सोडण्याची व संकटांना न घाबरण्याचे पक्ष्यांचे हे गुण माणसांना संकटांना न घाबरण्याचे आणि स्वतःचे निवासस्थान न सोडण्याची शिकवण देतात.
काही पक्ष्यांचा हा विणीचा हंगाम आहे. पक्ष्यांनी घरट्यात अंडी घातली आहेत. त्यामुळे अंड्यांची सुरक्षा व नवीन घरटे पावसात पुन्हा बांधता येणार नसल्यामुळे पक्षी आपापल्या घरट्यात वादळात स्थिर होते. तसेच काही झाडे उन्मळून पडल्यानंतरही अनेक पक्षी घरट्याजवळच बसून होते. काही नवथर पक्षी वादळाचा अंदाज न आल्याने एकाच ठिकाणी स्थिर बसून राहिल्याचा अंदाज आहे.
-रामेश्वर मुंढे, पशुपक्षी अभ्यासक, माणगाव