वीजपुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न
माणगाव ः प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळात महावितरणचे प्रचंड नुकसान झाले. माणगाव नगरपालिका हद्दीतील जवळपास 70 टक्के भागातील वीजपुरवठा सुरू झाल्याने आता हळूहळू 15 दिवसांनंतर का होईना लोकवसाहती उजळत आहेत. अजूनही 30 टक्के भागातील खंडित वीजपुरवठा सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न होत आहेत, पण महत्त्वाचा नगरपंचायत पाणीपुरवठा विद्युत पुरवठा मात्र अजूनही दुर्लक्षित असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. खेडेगावात सर्व वीज खांब व ट्रान्सफार्मर जमिनीवर उन्मळून पडले आहेत. कर्मचार्यांची कमतरता, पावसाची संततधार या सर्व अडथळ्यांमुळे वाडी-वस्तीवर वीज येण्यास किमान एक महिना उजाडू शकतो, असे अभियंता सचिन यादव यांनी सांगितले.
सध्या आलेल्या ठाणे, कल्याण महावितरण पथकातील कंत्राटी तसेच त्या त्या भागातील स्थानिक नागरिकांच्या मदतीने हे काम सुरू आहे. लाइनमेन, हेल्पर जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. तरीही तालुक्यातील शेकडो गावे अजूनही विजेच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात युद्धपातळीवर कामाची अपेक्षा होती, पण मुसळधार पावसाने कामात व्यत्यय येत आहे. महावितरणने आणखी पथक मागवावे, अशी येथील कर्मचार्यांची मागणी आहे.