पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही हे भारतीयांना एव्हाना पूर्णपणे पटलेले आहे. कारण गेल्या सहा वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी तडफेने घेतलेले निर्णय जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेत आणि अनुभवले देखील आहेत. सर्वांना सोबत घेऊन देशाचा विकास साधावयाचा असेल तर मोदींना पर्याय नाही हे सत्य आहे. विरोधी पक्षांनी ते आता तरी स्वीकारावयास हवे.
अर्वाचीन भारताच्या इतिहासात अनेक दिग्गज नेते होऊन गेले. त्यापैकी प्रत्येकाने भारताच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलला. या देशाने विश्वाला बुद्ध दिला तसेच अहिंसेची शिकवण देणारे महात्मा गांधी देखील दिले. येथे तुलना करण्याचे काहीच कारण नाही. परंतु कमीत कमी वेळात अवघ्या विश्वावर आपली अमिट छाप सोडणार्या आजच्या मोजक्याच विश्वनेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. गेल्या अवघ्या सहा-सात वर्षांत या असामान्य नेत्याने भारतीय मनांवरच नव्हे तर अखिल विश्वात मिळवलेला लौकिक किंवा स्थान अनन्यसाधारण आहे असे म्हणावे लागेल. कोरोना विषाणूमुळे अवघ्या जगामध्ये अभूतपूर्व अशी बिकट परिस्थिती ओढवली आहे. आर्थिक व सामाजिक पेचप्रसंगांना तोंड देता-देता भल्याभल्या नेत्यांची झोप उडाली आहे. अशा परिस्थितीत भारतासारख्या 138 कोटी इतकी प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाची कमान मोदींसारख्या समर्थ नेत्याच्या हाती आहे हे भारताचे भाग्यच म्हटले पाहिजे. एका माध्यमसमुहाने नुकत्याच केलेल्या पाहणीनुसार तब्बल 78 टक्के लोकांना मोदी हेच भविष्यातील पंतप्रधान असावेत असे वाटते, तसेच सरहद्दीवर चीनने सुरू केेलेल्या कुरापतींना उत्तर देण्याची क्षमता फक्त पंतप्रधान मोदींमध्ये आहे, असे बहुसंख्य भारतीयांना वाटते. किंबहुना, या घटकेला पुन्हा सार्वत्रिक निवडणुका घेण्याची वेळ आली तर मोदी-अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील एनडीए 316 जागा पुन्हा पटकावेल असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. याउलट सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून कसाबसा तग धरून असलेली काँग्रेस 49 जागांच्या पुढे जाऊ शकणार नाही असे ही पाहणी सांगते. तसे पाहू गेल्यास या निष्कर्षांमध्ये धक्कादायक असे काहीच नाही. आश्चर्य वाटावे असे तर मुळीच नाही. गेल्या सहा वर्षांत भारताने दोन सार्वत्रिक निवडणुका पाहिल्या. या दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनतेने मोदीजींना कौल दिला. तथापि, विरोधकांनी मोदींना वैयक्तिक टीकेचे लक्ष्य करणे थांबवले नाही. अर्थात पंतप्रधान मोदी यांची जितकी निंदानालस्ती विरोधक करतात तितके त्यांचे मताधिक्य वाढते हे निवडणुकीच्या आकडेवारीवरूनच स्पष्ट होते. तिहेरी तलाकचे उच्चाटन, 370 कलमाची हकालपट्टी, नागरिकत्व कायदा, जनधन योजनेअंतर्गत 40 कोटींहून अधिक लोकांची बँकेत खाती उघडणे, जनतेच्या खात्यात थेट मदतीची रक्कम पोहचवणे अशा कित्येक धाडसी निर्णयांना मोदी यांनी प्रत्यक्षात आणून दाखवले. इतकेच नव्हे तर 495 वर्षे ज्या समस्येने भारताचा इतिहास पोखरला त्या प्रस्तावित राममंदिराच्या जागेचा प्रश्न देखील त्यांनी सनदशीर मार्गाने सोडवून दाखवला. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. उरीचा हल्ला असो किंवा लडाखमध्ये चीनने काढलेली कुरापत असो, पंतप्रधान मोदी यांच्या मुत्सद्दीपणामुळे भारताच्या सरहद्दी सुरक्षित राहिल्या आहेत. या सार्यामुळेच मोदी यांच्या लोकप्रियतेची टक्केवारी वाढतच राहणार आहे. कारण हा विश्वनायक भारतीयांच्या हृदयामध्ये अढळ स्थानी बसला आहे.