पालकमंत्री पदावरून विश्वासात घेतले नसल्याने त्रस्त
मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असलेले नाराजीसत्र आता पालकमंत्री नियुक्त्यांमध्येही रंगल्याचे दिसत आहे. कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती केल्याने महसूल मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात नाराज झाले आहेत. ‘आपल्याला कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नको, आपल्याऐवजी पक्षाच्या कोणत्याही मंत्र्याला ते द्यावे,’ अशी भूमिका थोरात यांनी घेतली असल्याचे सांगण्यात येते.
रखडलेली पालकमंत्री नियुक्तीची यादी बुधवारी (दि. 8) रात्री जाहीर झाली. त्यानंतर काँग्रेस नेते थोरात नाराज झाले असल्याचे त्यांच्या निटवर्तीयांकडून समजले. पालकमंत्र्यांची यादी तयार करताना थोरात यांना विश्वासात घेण्यात आलेले नाही. त्यांची नियुक्ती करताना आणि त्यांच्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नियुक्तीही परस्पर झाल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
अहमदनगरचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती केलेल्या हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्रिपद द्यावे आणि आपल्याऐवजी काँग्रेसमधील इतर कोणत्याही मंत्र्याला अहमदनगरचे पालकमंत्रिपद द्यावे. आपल्याला कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नको, अशी मागणी आता थोरात हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन करणार आहेत.