Breaking News

संकट सरण्याची आशा

आताच्या घडीला जगभरातच कोरोना संकट अधिक गहिरे झाल्याचे चित्र निर्विवादपणे दिसते आहे. परंतु तरीही आशेला जागा आहे असे म्हणायला हरकत नाही. परिणामकारक ठरणारी औषधे बाजारात येऊ घातली आहेत. प्रभावी लसही पाठोपाठ येईलच. तोवर मात्र आपण खबरदारी घेत राहिलेच पाहिजे.

जगभरातील तमाम देशांतील जनजीवन जवळपास ठप्प करणार्‍या कोरोना संकटाचे सध्याचे चित्र चिंताजनकच आहे. लाखांच्या घरात रुग्ण आणि मृतांची संख्या पाहिलेल्या देशांसह अनेक देशांमध्ये एव्हाना हळूहळू जनजीवन खुले करण्याच्या दिशेने पावले पडू लागल्याने कोरोना रुग्णांचे आकडे वेगाने वाढत आहेत. हा वेग इतका अधिक आहे की सध्याच्या रुग्णांपैकी जवळपास 42 टक्के केसेस या गेल्या महिनाभरातील आहेत. जगभरातील सध्याची रुग्णसंख्या ही जवळपास 87 लाख इतकी असल्याचे दिसते. सध्या सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या दहा देशांपैकी आठ देशांमध्ये रुग्णसंख्या वाढण्याचा वेग लक्षणीय आहे. यात ब्राझील, अमेरिका, भारत, मेक्सिको, पेरू, चिली, पाकिस्तान आणि इराण यांचा समावेश होतो. उर्वरित दोन देशांमध्ये अर्थात रशिया आणि ब्रिटनमध्ये तो तितकासा लक्षणीय नाही. हा वेग मोजताना पाच दिवसांची सरासरी काढून तो मोजला जात असल्यामुळे रुग्णांच्या नोंदणीत होणार्‍या चढउतारांचा परिणाम त्यावर होत नाही. काही देशांमध्ये केसेसची नोंद ठेवण्याची पद्धत अचानक बदलते तर काही ठिकाणी जुन्या नोंदींची भर अकस्मात टाकली जाते. या सार्‍यातून मोजदादीत होणार्‍या गफलती टाळण्याच्या पद्धती एव्हाना विकसित करण्यात आल्या आहेत. इतरही अनेक बाबतीत आता चांगली सुधारणा शक्य झाल्याने सुरूवातीला कोरोना विषाणू जगभरातच जितका रहस्यमय वाटला होता तितकासा आता उरलेला नाही. प्रत्येक सरत्या दिवसागणिक आपले या विषाणू तसेच त्यातून उद्भवणार्‍या कोविड-19 या आजारासंबंधातील ज्ञान वाढत चालले आहे. यातील काही बाबींमुळे त्यासंदर्भातील सार्वत्रिक घबराट कमी होण्यास मदत झाली असली तरी कोरोना विषाणूची निरनिराळी रूपे चिंतेत भरही टाकत आहेत. काही केसेसमध्ये रुग्णाची प्रकृती अकस्मात थेट चिंताजनक टप्पा गाठत असल्याने कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कोटेकोरपणे खबरदारी घेत राहण्याला तूर्तास तरी पर्याय दिसत नाही. आजच्या घडीला कोविड-19वरील एक ठोस उपाय आपल्या हातात नसला तरी जगभरातील डॉक्टरांना एव्हाना त्यावर कुठले उपचार प्रभावी ठरतात आणि कुठले नाहीत याचा बर्‍यापैकी अंदाज आला आहे. त्यामुळेच कंपन्यांकडून प्रभावी औषधे बाजारात आणण्याच्या हालचालींनीही वेग घेतल्याचे दिसते आहे. भारतात अलीकडेच अशा दोन औषधांच्या उत्पादनांना परवानगी देण्यात आल्याचे कंपन्यांकडून जाहीर करण्यात आले. गंभीर प्रकृती रुग्णांना वाचवण्यातही डॉक्टरांना अधिक प्रमाणात यश येते आहे. हे सारे आशादायी असले तरी रुग्णसंख्या अफाट वेगाने वाढते आहे आणि एकंदर परिस्थिती चिंताजनक आहे हे सत्य नाकारता येणार नाही. कोरोनापासून स्वत:चा बचाव करतानाच उपजीविकाही सांभाळण्याचे आव्हान जगभरातील प्रत्येकासमोरच आहे. या अपरिहार्यतेतून अनेक देश हळूहळू निर्बंध खुले करीत आहेत. कोरोनाचे संकट अभूतपूर्व आहेच. परंतु ते लवकरच आटोक्यात येईल अशी आशा मात्र वाटू लागली आहे. जगभरातील शास्त्रज्ञ त्याकरिता लस विकसित करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना यश येऊन जगाची या भीषण संकटातून लवकरच सुटका होईल. परंतु तोवर दक्षता बाळगण्याला पर्याय नाही.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply