Breaking News

दहशतवादाचा विषाणू

ऐन सणासुदीच्या हंगामात देशात घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. यामुळे देशवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यानंतर काही आठवड्यांच्या आतच भारतात पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात सापडले ही निश्चितच काळजीची बाब आहे. मुंबई पोलिसांना पत्ताही लागू न देता दिल्ली पोलिसांनी धारावी येथील रहिवासी असलेल्या जान महंमद शेख नावाच्या संशयितास रेल्वेप्रवासादरम्यान राजस्थानातील कोटा येथून उचलले आणि अटक करून दिल्लीला नेले. दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या सहा दहशतवाद्यांपैकी दोघांना पाकिस्तानची कुप्रसिद्ध गुप्तचर संघटना आयएसआयने प्रशिक्षण दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या सहाही दहशतवाद्यांची दिल्ली पोलिसांतर्फे कसून चौकशी सुरू असून बाहेर आलेल्या माहितीनुसार भारतात दहशतवादाचा वणवा पेटता ठेवण्यासाठी पाकिस्तानी आयएसआयने अंडरवर्ल्डच्या गुंडांना पुन्हा एकदा सुपारी दिली होती असे कळते. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याकडे या वेळच्या हल्ल्याचे सूत्रसंचालन आयएसआयने सोपवले होते. त्यासाठी शक्तिशाली स्फोटके आणि हातबॉम्बसारखी सामग्री भारतात आणण्याची जबाबदारी दाऊदच्या टोळीवर सोपवण्यात आली होती. या माहितीमुळे पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा भारतात अशांतता माजवण्यासाठी कशा पुढे सरसावल्या आहेत ते उघड झाले आहे. 2008 साली 26 नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिमच होता. त्याआधी 12 मार्च 1993 रोजी भीषण बॉम्बस्फोटांच्या मालिकेच्या रूपात मुंबईकरांनी दहशतवादाचा भयानक अनुभव घेतला होता. त्या बॉम्बस्फोटांची सूत्रेदेखील कराचीमध्ये पाकिस्तानच्या कृपेने आराम फर्मावणार्‍या दाऊद इब्राहिमनेच हलवली होती हे सार्‍यांनाच माहीत आहे. दिल्ली पोलिसांनी मुंबईनिवासी दहशतवाद्याच्या धरपकडीचे ऑपरेशन पार पाडले आणि त्याची सुतराम कल्पना मुंबई पोलिसांना असू नये हे आश्चर्यकारक वाटते. मुंबई पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक वेगळा तपास करीत असून मुंबईतील उपनगरी रेल्वेगाड्या हेच दहशतवाद्यांचे प्रमुख लक्ष्य होते असे आता सांगण्यात येत आहे. यावर भलत्याच कामांमध्ये पोलिसांना गुंतवून मुंबईला वार्‍यावर सोडणारे महाविकास आघाडी सरकारचे गृहखाते झोपा काढत होते काय, असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. शेलार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला राजकीय टीका न मानता सत्ताधारी आघाडीने थोडे अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. कारण इथे मुंबईकरांच्या व कामानिमित्त रोज मुंबईत येणार्‍या कित्येकांच्या सुरक्षिततेचा सवाल आहे. राज्यभरात एकंदरच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उग्र स्वरूप धारण करू लागलेला आहे असे दिसते. महाविकास आघाडी सरकारमधील संभ्रम व गोंधळयुक्त कारभारामुळे फक्त मुंबईकरच नव्हे; तर अवघ्या महाराष्ट्राचे नागरिक हवालदिल होऊ लागले आहेत. अशा सावळ्या गोंधळामध्ये दहशतवादाचा भस्मासूर जागा झाला तर त्याची प्रचंड मोठी किंमत चुकवावी लागेल हे लक्षात घ्यायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सजग कारभारामुळे पाकिस्तानची नांगी तूर्त ठेचली गेली असली तरी दहशतवादाचा सर्प कधी डोके वर काढेल हे सांगता येणार नाही. ही राजकारणाची वेळ नाही हे सर्वांत आधी ध्यानात ठेवलेले बरे. फक्त मुंबईकरांनाच नव्हे; तर संपूर्ण देशाला वेठीस धरणारा हा दहशतवादाचा विषाणू रोखायलाच हवा.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply