रोहे ः प्रतिनिधी
कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी तालुक्यात प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत, परंतु त्याला यश मिळत नसून कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. रोहा तालुक्यात मंगळवारी 11 कोरोना संसर्ग बाधित व्यक्ती आढळल्याची माहिती रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे. रोहा तालुक्यात आता एकूण सक्रिय बाधितांची संख्या 100वर पोहचली आहे, तर मंगळवारी एका दिवसात 15 लोकांनी कोरोनावर मात करीत बरे होत आपल्या घरी गेले आहेत. मंगळवारी एक पुरुष व एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये शहरात तीन, तर ग्रामीण भागात आठ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या असून त्यात सहा पुरुषांचा व पाच महिलांचा समावेश आहे. यात एका 67 वर्षीय वयोवृद्धाचा समावेश आहे.
उरणमध्ये नऊ नवे रुग्ण; 14 जण कोरोनामुक्त
उरण ः प्रतिनिधी, वार्ताहर
उरण तालुक्यात मंगळवारी नव्याने कोरोनाचे आणखी नऊ रुग्ण निष्पन्न झाले आहेत, तर 14 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये केगाव आवेडा एक, नागाव हिंदू कॉलनी एक, करळ एक, भवरा एक, नवघर दोन, जासई दोन व कोटनाका एक अशा नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. तर विंधणे नवापाडा तीन, खोपटे एक, मुळेखंड एक, मोरा दोन, नागाव दोन, डोंगरी एक, बोरी दोन व जासई दोन असे एकूण 14 कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. उरण तालुक्यातील आजतागायत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 522पर्यंत पोहचली आहे. यापैकी 328 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर 181 पॉझिटिव्ह रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.