Breaking News

संधिवातातील पथ्य

सामान्यत:  संधिवात म्हटला की सांध्यांना सूज येणे, ताठरता येणे आणि वेदना हे आठवते. आयुर्वेदात संधिवाताचे विस्तृत वर्णन केले असून वाताच्या व्याधींमध्ये अनेक प्रकार, त्यांची लक्षणे नमूद केली आहेत. संधिवातात आहाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या आजारात पथ्याला अधिक महत्त्व आहे.

काय खाऊ नये? सर्व प्रकारचे तुरट पदार्थ संधिवाताची लक्षणे वाढवतात. त्यामुळे सुपारीचे व्यसन असणार्‍यांनी संधिवात असल्यास व्यसन सोडणे आवश्यक आहे. काही स्त्रिया भाजकी माती खातात. ही माती भाजकी असली तरी संधिवात वाढवते. मीठ जास्त असलेले पदार्थ टाळावेत. विशेष करून डबाबंद पदार्थ वर्ज्य करावेत. वेफर्स, आकर्षक पाकिटातील कुरकुरीत पदार्थ यांच्यासह डब्यातील द्रव पदार्थ, शीतपेय, ‘रेडी टू इट’ तयार पिठे, तयार भाज्या यांचे सेवन संधिवाताची लक्षणे वाढवताना दिसून येतात. फळांमध्ये जांभळासारखी फळे, तसेच ताडगोळे संधिवात वाढवतात. रताळी, साबुदाणा, साबुदाण्याचे तळलेले पदार्थ, बटाटा, मैद्याचे तळलेले पदार्थ संधिवात वाढवतात. अळूचे कंद वा अळूच्या पानांची वडी खाणे शक्यतो टाळावे. कामलकंद हा पदार्थ इतर व्याधींमध्ये पथ्यकर असला तरी संधिवातामध्ये अपथ्यकर आहे. न्याहारीत पोहे वा पराठे संधिवातात खाऊ  नयेत. बेसनाचे पदार्थ संधिवातात टाळावे.

संधिवात आणि मांसाहार

संधिवातात मांसाहार करताना वाळवलेले मासे घालून केलेली भाजी खाऊ नये. कोरडे मांस, साठवलेले मासे, साठवलेले मांस संधिवात असणार्‍यांनी सेवन न करणे फायदेशीर असते. संधिवाताच्या रुग्णांनी स्थूल असल्यास म्हशीच्या दुधाचे सेवन करू नये, तसेच दुधाचे नासवलेले पदार्थही खाऊ नयेत. पनीर, खवा, पेढा कृश व्यक्तींनी खूप भूक लागली असेल तरच खावेत. मध हा पदार्थ कफ, मेद कमी करणारा असला तरी वात वाढवणारा आहे. मध हा शरीरात कोरडेपणा निर्माण करणारा आहे. त्यामुळे संधिवातात मधाचे सेवन करू नये. मधाचा वापर मात्र संधिवाताच्या रुग्णांना बस्ती देण्यासाठी करायला हरकत नाही.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply