विविध प्रयोगांतून विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानगंगा

पाली ः प्रतिनिधी
कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 16 मार्चपासून शाळा बंद झाल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा 15 जूनपासून काही ठिकाणी ऑनलाइन शाळा सुरू झाल्या आहेत, मात्र या सर्व कालखंडातदेखील कोविड-19ची विविध प्रकारची कामे व जबाबदार्या सांभाळत अनेक शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही. अनेक शिक्षक विविध उपक्रम व प्रयोगांतून विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानगंगा पोहचविण्याचे काम करीत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. रायगड जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबविलेल्या व यशस्वी ठरलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सुधागड तालुक्यातील राजिप शाळा नेनवलीचे उपशिक्षक राजेंद्र अंबिके यांनी कोविड-19 ग्रामपंचायत नियंत्रण कक्ष तसेच नांदगाव चेक पोस्ट येथील ड्युटीसोबत नेणवली पालक मित्र ग्रुपद्वारे शाळा बंद शिक्षण सुरू अभ्यासमाला सुरू केली, तसेच एलएफडब्ल्यू क्वीझ सहभाग, अॅक्शन रिसर्च 20 या डाएट ग्रुपवरील चर्चेचे डिजिटल पुस्तकात रूपांतर करून फ्लिपबुक निर्मिती, सुधागड तालुका शिक्षकांसाठी प्रश्नमंजुषा निर्मिती, एससीइआरटी दीक्षा अॅपसाठी कार्यानुभव व्हिडीओ निर्मिती केली.

उरण तालुक्यातील रा. जि. प. शाळा रानवडचे उपशिक्षक रत्नाकर पाटील यांनी महाराष्ट्रातील काही मुलांना गुगल क्लासरूमच्या माध्यमातून शिक्षणरूपी वाघिणीच्या दुधाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. इ.1ली ते 5वीचे 150हून अधिक विद्यार्थी या ऑनलाइन टेस्टशी जोडले गेले व कोरोनाच्या वातावरणात असूनही मराठी, गणित व इंग्रजीचे टेस्ट पेपर मुले आज सोडवत आहेत.
मुरूड तालुक्यातील चोरढे शाळेचे शिक्षक राजेंद्र नाईक यांनी 15 जून शैक्षणिक वर्ष सुरू पण शाळा बंद यासाठी शाळापूर्व तयारी अंतर्गत दरदिवशी एक विषय, त्यानुसार घटक निवडून दोन ते चार पानांवर स्वाध्याय तोही विचारप्रवर्तक, वैविध्यपूर्ण असा दरदिवशी फक्त दोन पाने असा अल्पखर्चीक ऑफलाइन स्वाध्याय देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील राजिप शाळा आरावी उर्दूचे शिक्षक समीर रब्बानी काजी सय्यद यांनी स्काइपच्या माध्यमातून बॅटल व्हर्सेस कोरोना समूहाद्वारे अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एससीईआरटी पुणेमार्फत दैनिक अभ्यासमालामध्ये योगदान दिले. ही http://www.bpegm.in hr website निर्मिती करून चार लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोेहचविली. तालुका स्तरावर झूम अॅपच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्यास तांत्रिक मदत केली. राज्यस्तरीय शैक्षणिक दिनदर्शिका उपक्रमात योगदान दिले.
कोरोना जनजागृती, विद्यार्थी पालक यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ई-साहित्य पाठविले. E-book नावाचे अॅप तयार केले. त्यात इयत्ता पहिली ते 10वी उर्दू माध्यमाच्या सर्व पुस्तकांचा समावेश आहे. दीक्षा अॅपसाठी व्हिडीओ निर्मिती करणार्या अनेक शिक्षकांना ते मार्गदर्शन करीत आहेत. तळा तालुक्यातील बोरघर हवेली केंद्राने मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी वर्क फ्रॉम होम या कालावधीतही मुलांचे शिक्षण बंद राहू नये म्हणून केंद्रातील शिक्षकांनी चक्क यू ट्यूब चॅनेल बनविले आहे. तसेच मुलांसाठी E-class नावाचे ई-लर्निंग अॅपही सुरू केले आहे. या उपक्रमासाठी केंद्रप्रमुख संदीप जामकर यांनी सर्व शिक्षकांना व्हिडीओ निर्मिती करण्यासाठी मार्गदर्शन केले.
शहापूरच्या शिक्षिका प्रीती पवार यांनी कार्यानुभवसंदर्भात प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई, कला व कार्यानुभव शैक्षणिक दीक्षा अॅपसाठी कला व कार्यानुभवचे काही व्हिडीओ चित्रीकरण करून ते यू ट्यूब चॅनलवर अपलोड केले. सफाळे येथील शिक्षक जतिन कदम यांनी 700 गोरगरीब कुटुंबांना विविध दानशूर व्यक्तींच्या मदतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. आरोग्य विभागाला कामात सहकार्य केले. कोरोनाबाबतही ते मार्गदर्शन करीत आहेत zpguru.in या वेबसाइट अंतर्गत राज्यभरातील विद्यार्थ्यांकरिता दररोज ऑनलाइन टेस्ट व व्हिडीओ बनविण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक व्हिडीओ तयार केले. अशाच प्रकारचे काम गोवणे-डहाणू येथील पदवीधर शिक्षिका प्रतिभा क्षीरसागर-कदम यांनीदेखील केले आहे. जिल्ह्यासह राज्यात अशा प्रकारे असंख्य शिक्षकांनी कोरोना जनजागृती, त्यासंदर्भातील विविध कामे व जबाबदार्या सांभाळत आपल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी उंचावण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून ते यशस्वीपणे सुरूदेखील आहेत.