आरोग्य प्रहर

कमी खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे व अत्याधिक खाणे दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. शरीराला कोणत्याही प्रकारचा अपाय न होता वजन कमी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आधुनिक जीवनशैलीत भरपूर खा, तयार बनविलेले पदार्थ खा, कितीही खा, अशा पद्धतीने आहार घेतला जातो. गरजेपेक्षा जास्त आहार शरीरात ढकलला जातो. आपल्याकडे अन्नपदार्थाचे स्वरूप, त्यातील पौष्टिक घटक न बघता फक्त पॅकिंग किंवा कंपनीचे नाव बघून अन्नपदार्थ खाल्ले जातात. या सर्व प्रकारामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे.
योग्य राहणीमान, योग्य मात्रेतील योग्य वेळी घेतला जाणारा सर्वसमावेशक आहार व आहार सिद्धांताचा अवलंब केला तर मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा यांसारख्या आजारांचे प्रमाण निश्चित कमी होऊ शकते. एखाद्या वादळाप्रमाणे झपाट्याने वाढत चाललेले मधुमेह, रक्तदाब, वाढते वजन, हृदयविकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी ताबडतोब उपाययोजना करणे गरजेचे आहे. वाढत चाललेल्या वजनाची मुळे ही आईच्या गर्भावस्थेच्या काळापासून असू शकतात. गर्भावस्थेतील अतिमात्रेतील, अतिपौष्टिक आहारही जन्मानंतरच्या वाढलेल्या वजनास कारणीभूत ठरतो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याच पद्धतीने जन्मणार्या बाळास भविष्यात काय आजार होऊ शकतात हे आईवडिलांची प्रकृती बघून समजू शकते.
वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा. व्यायामात सतत बदल करा. एकाच प्रकारचा व्यायाम काही काळानंतर फायदेशीर ठरत नाही. शरीरातील आळस, सुस्ती झटकून सतत क्रियाशील राहण्याचा प्रयत्न करावा. अनुवंशिकतेने वजन वाढले आहे म्हणून स्वत:ला दोष देऊ नका. कुठल्याही प्रकारचे क्रॅश डाएट करू नका. दररोज एकच पदार्थ खाण्यापेक्षा आहारात विविधता आणण्याचा प्रयत्न करावा. किती खातोय यापेक्षा काय खातो याकडे लक्ष द्या. नियमित जेवणाऐवजी आठवड्यातून दोन वेळा फळे, दोन वेळा कोशिंबीर, दोन वेळा कडधान्ये, दोन वेळा फळांचा रस, दोन वेळा पालेभाज्यांचा रस किंवा सूप घेण्याचा प्रयत्न करावा. नियमितपणे आपली आरोग्य तपासणी करावी.