कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगर रांगेत आणि आसपासच्या जंगलात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात प्राण्यांच्या शिकारी होत आहे. तेथे दिवसा आणि रात्रीदेखील प्राणी जाळ्यात अडकवून मारण्यासाठी जाळी घेऊन फिरताना दिसत आहेत. दरम्यान, माथेरान आणि परिसरातील जंगल हे संरक्षित वन असून या जंगलात कोणत्याही प्राण्यांना मारण्यास बंदी आहे, असे असताना दररोज प्राणी आणि पशु मारले जात असून त्यांना वन विभागाचे अभय आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून माथेरानमध्ये बाहेर कोणीही पडत नसल्याचा फायदा काही लोक घेत आहेत. मोठ्या प्रमाणात प्राण्यांची शिकार करण्यासाठी काही लोक दस्तुरी परिसर ते कड्यावरचा गणपती या भागात किमान 15 ते 20जण टोळक्यांनी येत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. त्याचवेळी रेल्वेच्या बाजूला जाळे लावून शिकार येण्याची वाट बघत राहण्याचे प्रकार घडत आहेत. त्यात प्राणी कोणत्या भागात आहेत, त्याची टेहळणी देखील केली जात असून टेहळणी करणारे आपल्या अन्य साथीदारांना त्याबाबत माहिती देत असतात. कधी जाळी लावून तर कधी आरडाओरडा करून प्राण्यांना पळविण्याचे प्रकार केले जात आहेत. भेकर, ससे, अस्वल, रानडुक्कर अशा प्राण्यांची शिकार केली जात असल्याचे बोलले जात आहे. एप्रिल 2020पासून जुलै महिना संपत आला तरी प्राण्यांची शिकार करण्याचे सुरूच आहे. तसेच रात्री बारा वाजेपर्यंत माथेरान जंगलात बॅटरीचाही प्रकाश दिसून येत असतो.
आम्हाला कोणत्या भागात जाळी लावून किंवा अन्य साहित्य वापरून प्राण्यांची शिकार केली जात आहे, हे कळवावे. आम्ही शिकार्यांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करू. आम्ही देखील जंगलात गस्त घालत असतो, अशावेळी कोणी आम्हाला संशयितपणे फिरताना दिसले तरी आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. -नारायण राठोड, वनक्षेत्रपाल नेरळ माथेरान