मुंबई : प्रतिनिधी
भारतीय वन डे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा सध्या जिममध्ये जोरदार मेहनत घेत आहे. दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकलेल्या रोहितचे लक्ष्य आता आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन डे मालिका आणि आयपीएल असणार आहे. वन डे आणि टी-20मध्ये मोठे फटके मारणार्या रोहितने सोशल मीडियावरून त्याची एक इच्छा व्यक्त केली आहे.
आक्रमक खेळीमुळे हिटमॅन अशी ओळख असलेल्या रोहित शर्माला जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट मैदानावर बॅटिंग करायची आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर कधी एकदा क्रिकेट खेळेन असे झाले आहे, असे रोहितने ट्विटरवर म्हटले आहे. रोहितने बीसीसीआयचा मोटेरा स्टेडियमच्या एरियल व्ह्यूचा फोटो रिशेअर केला. तो म्हणतो की, या शानदार मैदानाबद्दल खूप काही ऐकले आहे. आता मी येथे खेळण्यासाठी फार काळ वाट पाहू शकत नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पाचव्या सामन्यात रोहितला दुखापत झाली होती. त्यामुळे तो वन डे आणि कसोटी मालिकेला मुकला. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष परिमल नाथवानी यांनी जानेवारी 2019मध्ये या स्टेडियमचा फोटो शेअर केला होता. हे मैदान प्रेक्षकांच्या बसण्याच्या क्षमतेबाबत मेलबर्न क्रिकेट मैदानापेक्षा मोठे असेल. मेलबर्न मैदानावर एकाच वेळी एक लाख प्रेक्षक सामना पाहू शकतात, तर मोटेरा मैदानावर एक लाख 10 हजार प्रेक्षक बसू शकतात. येत्या 24 तारखेला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या मैदानाचे उद्घाटन करतील. बीसीसीआयने या मैदानाच्या एरियल व्ह्यूचा फोटो शेअर केला आहे.