वनखात्याची उदासीनता; सिस्केप सामाजिक संस्थेचा प्रयत्न;सावित्री पात्रातील मगरींच्या मृत्यूचे गूढ; दै. रामप्रहरचा अंदाज ठरला खरा
सावित्री नदीच्या पात्रातील मगरींच्या वास्तव्याने महाड परिसराची एक नवी ओळख झाली असली तरी त्यांची वाढती संख्या आणि त्यांच्या अचानक मृत्यूचेही एक वेगळेच गूढ वाढले आहे. गेल्या वर्षातील या मगरींच्या होणार्या मृत्यूनेही पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त होत असताना महाडच्या सिस्केप संस्थेने या मगरींच्या मृत्यूचे कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. याकरिता सिस्केपच्या सदस्यांनी सावित्री नदीच्या पात्रातील दूषित पाण्याचे नमुने परीक्षणाकरिता पाठविले आहेत. तर या प्रकरणी दै. ‘रामप्रहर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार हे भूकबळी नसून पाण्यातील वाढत्या केमिकलच्या घटकांमुळेच या मगरींचे मृत्यू होत आहेत ही बाब आता प्रकर्षाने पुढे आली आहे.
महाडमध्ये आलेल्या 2005 सालच्या महापुरानंतर सावित्री व गांधारी नदीच्या पात्रातील मगरींचे वास्तव्य उजेडात आले. गोड्या पाण्यातील मगर असे या मगरींचे नाव असून त्यांना मार्श क्रोकोडाईल असेही म्हणतात, तर त्याचे शास्त्रीय नाव पालूस्ट्रीस क्रोकोडायलस असे आहे. या जातीच्या मगरींचे वास्तव्य देशभरातील सर्वच पाणथळ व नदींच्या पात्रात दिसून येतो व त्या माणसांवर स्वत:हून हल्ला करीत नसल्याचे तज्ञ म्हणतात. महाडच्या आसपास सन 2005 नंतर गेल्या 12 ते 13 वर्षांत मगरींची संख्याही वाढत गेल्याने सावित्री नदीच्या पात्रातून डोकं वर काढून तरंगणार्या व जबडा उघडून पाण्याबाहेर किनार्यावर बसणार्या मोठ्या मगरी दिसू लागल्या. अनेक वेळा सावित्री नदीचे पात्र सोडून आसपासच्या पाण्याच्या जागांमध्ये काही मगरी स्थलांतरीत होऊ लागल्याचे अनेक नागरिकांना दिसून आले. त्याप्रमाणे त्यांचे योग्य स्थलांतर सिस्केप संस्थेच्या सदस्यांकडून आजपर्यंत होत आहे. 2013पासून सिस्केप संस्थेने अशा वाट चुकलेल्या 37 मगरींचे सुरक्षित स्थलांतर केले. या उपक्रमात महाडच्या वनविभागाचे सहकार्य लाभले. गेल्या वर्षभरात चार मगरी वेगवेगळ्या ठिकाणी मृतावस्थेत आढळल्या. 6 ते 8 वर्षे वयोमान असलेल्या या मृत मगरी महाड येथील भोई घाट, मिलिटरी हॉस्टेल, वडवली व एक शेडाव नाक्याच्या आसपास सापडल्याने त्यांचा मृत्यू कशामुळे होत आहे हे शोधून त्यावर काही उपाययोजना करता येतील काय, असा विषय सध्या सिस्केप संस्थेने हाती घेतला आहे.
पृथ्वीवर डायनासोर यांच्या काळापासून मगर हा प्राणि अस्तित्वात आहे. बदलत्या वातावरणाने डायनासोर प्रजाती नष्ट झाली, मात्र प्रतिकूल परिस्थितीतही मगर या प्रजातीने आजही पृथ्वीवर मानवापूर्वीपासूनचे आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. मगरीचे आयुष्यमानदेखील मानवापेक्षा जास्त आहे. तसेच अन्न शोधण्यासाठी मगरी शेकडो किमीचा प्रवास करू शकतात. अशा परिस्थितीत सावित्री पात्रात अन्न कमी झाले तर या मगरी अन्नाच्या शोधात खोल खाडीत जाऊ शकतात, मात्र तसे न करता या मगरी महाड परिसरातच वावरत आहेत. याचे कारण या ठिकाणी मगरींना मुबलक अन्न उपलब्ध आहे. प्रतिकूल परिस्थितीतही आपले अस्तित्व टिकवून ठेवणार्या या मगरींच्या मृत्यूमागचे गूढ नक्की काय आहे? असा प्रश्न महाडकरांना पडला आहे.
सावित्री खाडीत महाड एमआयडीसीमधील केमिकल कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी सोडले जाते. काही जाणकारांचे म्हणणे आहे की, या प्रदूषित पाण्यामुळेच या मगरींचा मृत्यू होत आहे, तर काहींचे म्हणणे आहे की, मासे मारण्यासाठी वापरण्यात येणार्या केमिकल
पावडरमुळेदेखील हा मृत्यू होऊ शकतो. वनखात्याच्या प्राथमिक अंदाजानुसार भूकबळीने या मगरींचा मृत्यू होत आहे, मात्र मगरींच्या शवविच्छेदन
अहवालानंतर या गूढ मृत्यूचे कारण समजणार आहे, मात्र या कार्यात महाड वन विभागाची भूमिका महत्त्वाची असून हा गंभीर विषय महाड वनविभाग म्हणावा तसा गंभीरपणे हाताळत नाही असे चित्र आहे. या प्रकरणी दै. ‘रामप्रहर’ने मगरींच्या या गूढ
मृत्यूप्रकरणी हे भूकबळीचे मृत्यू नसून सावित्री नदीतील पाण्यातील वाढत्या केमिकल घटकांमुळेच होत आहेत ही बाब आता पुढे आली आहे.
मगरींचे सुरक्षित स्थलांतर करण्याच्या कामात महाड परिसरातील ग्रामस्थांची खूप मोलाची मदत होत आहे. नदीचे पात्र सोडून मगर कुठेही आल्याचे दिसताच नागरिक ताबडतोब वनखात्याकडे किंवा थेट सिस्केप संस्थेशी संपर्क साधतात. याबाबत सिस्केप संस्था गेल्या अनेक वर्षे वन्य प्राण्यांबाबतचे प्रबोधन करीत आहे.
सिस्केप संस्थेकडून मगर बचाव मोहिमेत गेल्या आठवड्यात सावित्री नदीतील मगरींच्या वास्तव्याच्या जागेतील पाण्याचे 14 ठिकाणचे नमुने अलिबाग येथील जे. एस. एम. महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यावर मगरींचा मृत्यू विषारी पाण्यामुळे झाला आहे किंवा कसे याबाबत अभ्यास करता येईल. सावित्री नदीच्या पात्रातील पाण्यात कार्बन व इतर विषारी घटक वाढल्याने पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण अत्यल्प झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळेच याच सावित्री नदीच्या पात्रात काही दिवसांपूर्वी मासेदेखील मोठ्या प्रमाणात मृत झाल्याचे दिसून आले होेते. महाड औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी, शहरातील गटाराचे सांडपाणी थेट नदीच्या पात्रात जात असल्याने तर सावित्रीचे पाणी प्रदूषित झाले आहेच, शिवाय मासेमारी करताना काही जण स्फोटके व विषारी द्रव्यांचा वापर करतात, अशीही माहिती पुढे आली आहे. त्याचा परिणाम मगरींच्या मृत्यूमध्ये होतो किंवा कसे याबाबतही उलगडा होईल. या कार्बनयुक्त पाण्यामुळे मगरींच्या डोळ्यांवर परिणाम होत असून त्यांच्या दृष्टीवर परिणाम झाल्याने नदीच्या किनार्यावरून त्या भरकटत दूर जातात. आजपर्यंत स्थलांतरीत केलेल्या मगरी या पाण्यापासून किमान 100 ते 700 मीटर अंतरावर सापडल्या आहेत.सिस्केपच्या या नव्या प्रयत्नातून काय हाती लागेल हे येणारा काळच सांगेल. तोपर्यंत नागरिकांमध्ये अशा वन्यप्राण्यांसंबंधी जागरूकता होणे गरजेचे असून या वन्यप्राण्यांना अभय देण्यासाठी वनविभाग, सामाजिक संस्थांबरोबरच नागरिकांचेही तेवढेच कर्तव्य आहे.
-महेश शिंदे