मुरूड : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील राजपुरी येथील सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे या किल्ल्यावर उपजीविका अवलंबून असलेले सुमारे 250 स्थानिक व त्यांच्या कुटुंबीयांची परवड होत आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी पाच लाखांपेक्षा जास्त लोक येत असतात. समुद्रात असणारा 22 एकरवरील हा दुर्ग पर्यटकांना आकर्षित करतो. या किल्ल्यात राजपुरी येथून शिडाच्या बोटीने जावे लागते. प्रत्येक बोटीवर चार ते पाच लोक काम करीत असतात. अशा 20हून अधिक बोटी राजपुरी येथे आहेत, मात्र मार्च महिन्यापासून जंजिरा किल्ला बंद असल्याने शिडाच्या बोटीवर काम करणारे लोक सध्या रोजगाराविना बसून आहेत. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी खोरा बंदर व दिघी बंदरातून मशीन बोटद्वारेसुद्धा प्रवासी वाहतूक केली जाते. या बोटींवरदेखील स्थानिक मजूरवर्ग काम करीत असतो, मात्र त्यांचाही रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होऊन सर्व स्थानिक लोक जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी करीत आहेत. बोटीवरील मजुरांबरोबरच येथे येणार्या पर्यटकांना विविध सेवा पुरविणारे चहा, सरबत, शहाळी, गॉगल, टोपी विक्रेते या सर्वांचे धंदे बंद आहेत. आग्रा येथील सुप्रसिद्ध ताजमहल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे, मग जंजिरा किल्ला खुला करण्यास अद्याप का प्रतीक्षा करावी लागत आहे, असा स्थानिकांचा राज्य शासनाला सवाल आहे. अनलॉक सुरू झाल्यानंतर सुटीच्या दिवशी पर्यटकांची पावले काशीद व मुरूड समुद्र किनार्याकडे वळू लागली आहेत, पण जंजिरा किल्ला बंद असल्याने त्यांचाही हिरमोड होत आहे.
गेल्या सात महिन्यापांसून जंजिरा किल्ला बंद आहे. त्यामुळे आमच्या भागात बेरोजगारी वाढली आहे.स्थानिकांना रोजगार नसल्याने त्यांचे उदरनिर्वाहाचे खूप हाल होत आहेत. रो-रो-सेवेप्रमाणे जलवाहतुकीलासुद्धा परवानगी देण्यात यावी.
-जावेद कारभारी, चेअरमन, वेलकम जलवाहतूक सोसायटी
जंजिरा किल्ल्यामुळे अनेक तरुणांना रोजगार मिळतो, पण सध्या किल्ला बंद असल्याने हे सर्व तरुण बेरोजगार झाले आहेत. राज्य शासनाने जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला करावा.
-श्रीकांत सुर्वे, अध्यक्ष, मुरूड तालुका प्रवासी संघटना
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जलवाहतूक तसेच वॉटर स्पोर्ट्स शासनाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. शासनाकडून ज्या वेळी नवीन आदेश निर्गमित होईल त्या वेळी सर्व वाहतूक सुरू करण्यात येईल.
-कॅप्टन सी. जे. लेपांडे, प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड