Sunday , June 4 2023
Breaking News

महायुतीचा डंका

करवीर निवासिनी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेना महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फोडून पुन्हा एकदा राज्यात भगवा फडकवण्याचा संकल्प केला आहे. त्यांचा हा संकल्प तडीस लावण्यासाठी आता सर्वांनीच कंबर कसणे गरजेचे आहे.

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद घेत पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्धार करीत रविवारी कोल्हापूर येथे लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राज्यातील सत्ताधारी भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीच्या जाहीर प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला. आता खर्‍या अर्थाने प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. पहिल्याच जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोशपूर्ण भाषण करताना पुन्हा आम्हीच सत्तेवर येऊ, असा विश्वास व्यक्त केला आहे, तर त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आता राज्यात केवळ आणि केवळ शिवसेना, भाजप, रिपाइं या महायुतीचीच हवा असल्याचा दावा करताच तपोवनच्या मैदानावर जमलेल्या लाखो कार्यकर्त्यांच्या मुखातून एकाच वेळी भाजप, शिवसेना महायुतीचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. याचवेळी कराडच्या प्रीतीसंगमावर काँग्रेस, राष्ट्रवादी

काँग्रेसप्रणित महाआघाडीचीही जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही सभांमध्ये कोल्हापूरचीच जाहीर सभा प्रचंड होती असेच अभिमानाने नमूद करावे लागेल.हा जनसागर आहे, असे जोशपूर्ण वर्णन मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून अनेकदा केले. सभेला झालेल्या अभूतपूर्व गर्दीचा उल्लेख करून आपण नतमस्तक झालो आहोत. ही युतीच्या विजयाची नांदी आहे, असा उल्लेखही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.  देशाला समर्थ सरकार मोदींच्याच नेतृत्वाखाली मिळू शकते. काँग्रेस-राष्ट्रवादी ही मॅनेजमेंट कंपनी आहे. विरोधकांना उमेदवार मिळत नाही. ज्यांना उमेदवारी दिली ते ती परत करत आहेत. नावात राष्ट्रवाद असला तरी अंगी राष्ट्रवाद येत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. आमचा हिंदुत्ववाद जातीधर्माच्या पलीकडे जाणारा आहे. भाजप-सेना युती हा फेविकॉलचा जोड असून तो कधीही तुटणार नसल्याची हमीही मुख्यमंत्र्यांनी दिल्याने सभेचे वातावरणच बदलून गेले. फडणवीसांप्रमाणेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ठाकरे शैलीत विरोधकांचा समाचार घेताना देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्रभाईंना विराजमान करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. ही महायुती भविष्यातही अशीच अखंडित राहणार असल्याची ग्वाही दिली. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या पक्षांचे नेते रामदास आठवले, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे यांनीही आम्ही महायुतीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही दिल्याने आता खर्‍या अर्थाने लढाईला रंगत येणार आहे. सन 2014मध्ये शिवसेना, भाजप महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातच करण्यात आला होता. त्यामुळे यावेळीही प्रचाराचा नारळ करवीरनगरीतच फोडून भाजप, शिवसेना महायुतीने पुन्हा एकदा दिल्ली काबिज करण्याचा संकल्प केला आहे. त्यांचा हा संकल्प तडीस लावण्यासाठी महायुतीतील घटक पक्षही आता सक्रिय झाले आहेत. त्यामुळे यावेळीही महायुतीचाच डंका वाजणार आहे.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply