खामगाव ः प्रतिनिधी
आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी सातपुड्याच्या पर्वतरांगेतील आदिवासी-वनवासी समुदायातील बांधवांचा ‘फगवा’ उत्सव नुकताच सालईबनात रंगला. यामध्ये महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदविला. ढोल, ढोलकी आणि मांडलचा वापर करून 9 आदिवासी-वनवासी चमूंनी उपस्थितांना
मंत्रमुग्ध केले. महात्मा गांधी लोकसेवा संघ, सालईबन परिवार, बिरसा मुंडा मंडळ, नेताजी नवयुवक दल, सामाजिक वन परिक्षेत्र जळगाव जामोद आणि तरुणाई फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जामोद तालुक्यातील सालईबन येथे रविवारी भव्य ‘फगवा’ महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवात सातपुड्याच्या पर्वतरांगेतील महाराष्ट्राच्या सीमेवरील आदिवासी-वनवासी बांधवांसोबतच मध्य प्रदेशातील विविध आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधव आपल्या परिवारासह सहभागी झाले होते. यात 9 आदिवासी-वनवासी चमूंचा सहभाग होता.
महाराष्ट्रातील वडपाणी, बांडापिंपळ, चालठाणा, भिंगारा, गोमाल, चाळीस टापरी, गोरक्षनाथ, उमापूर, इस्लामपूर, चारबन, मेंढाचारी, कुंवरदेव, आमपाणी, सोनबर्डी, वसाडी, हड्यामाल, अंबाबरवा या गावांतील आदिवासी चमूंसोबतच मध्य प्रदेशातील बादलखोरा, चिल्लारा, आमलापाणी, करोली, जैसोंकी येथील चमू ढोल, ढोलकी आणि ‘माडंल’ घेऊन ‘फगवा’ महोत्सवात सहभागी झाले. या वेळी सह. आयुक्त टी. जी. पाचारणे (जीएसटी, अमरावती), उपवनसंरक्षक संजय माळी, एस. जी. खान, जि. प. सदस्या रूपाली काळपांडे, सुनगावच्या सरपंच विजयाताई पाटील यांची उपस्थिती होती.