Breaking News

रुग्णसंख्येत वाढ, पण…

या आठवड्यात कोरोनासंबंधी बातम्या काहिशा नजरेआड झाल्या असल्या तरी त्याचा अर्थ महामारीचा प्रभाव कमी झाला असा होत नाही. एकीकडे शुक्रवारी देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 20 लाखांच्याही पुढे गेल्याचे वृत्त आले, तर सोबतच कोरोना बळींचे प्रमाण आणखी कमी झाल्याची आनंदवार्तादेखील. लसनिर्मितीसंबंधी घडामोडींनीही वेग घेतला असून जगभरातील निरनिराळ्या देशांमध्ये लॉकडाऊन उठवण्याची निरनिराळ्या स्वरूपाची परिणती दिसत आहे.

या आठवडाभरात महाराष्ट्रात मुंबई व आसपासच्या परिसरातच नव्हे तर अन्यत्रही पावसाचा जोर इतका दिसला आहे की कोरोना महामारीसोबतच अतिवृष्टीच्या संकटाचा विचारही तितक्याच प्राधान्याने करणे भाग पडत आहे. अर्थात आपण लक्ष अन्यत्र वळवले म्हणून कोरोना महामारीचा फैलाव काही कमी होणार नाही. उलट दुर्लक्ष झाले तर तो वाढण्याची शक्यताच आजही तितकीच दिसत आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या शुक्रवारी 20 लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेली. याच वेगाने रुग्णसंख्या वाढत राहिली तर या महिनाअखेरीपर्यंत आपण ब्राझिलला मागे टाकू, असे म्हटले जात आहे. अर्थात आपल्याकडील कोरोना मृत्यूदर आणखी खाली गेला आहे ही एक दिलासादायक बाब आहेच, पण रुग्णसंख्या किती वेगाने वाढत आहे याकडेही लक्ष दिले पाहिजेच. अवघ्या दोन दिवसांपूर्वी आपल्याकडील रुग्णसंख्या 19 लाखांवर गेली होती आणि शुक्रवारी ती 20 लाख 27 हजार 74वर जाऊन पोहचली. आजघडीला सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या अमेरिकेची एकूण रुग्णसंख्या 47.28 लाख इतकी आहे, तर ब्राझिलमध्ये एकूण 28.01 लाख रुग्ण आहेत. आपल्याकडील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे तसेच मृत्यूदरही जागतिक मृत्यूदराच्या बराच खाली आहे. आतापर्यंत 41 हजार 585 जण कोरोनामुळे दगावले आहेत, तर तब्बल 13.78 लाख लोक या साथीच्या आजारातून बरे झाले आहेत. एव्हाना दोन कोटी 27 लाख 88 हजार 393 नमुन्यांची कोरोना चाचणी देशभरात पार पडली आहे. आपल्याकडील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 67.98 टक्क्यांवर गेले आहे, तर मृत्यूदर 2.05 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांच्याद्वारा संयुक्तपणे बनवली जाणारी लस वेगाने बाजारात यावी याकरिता जागतिक कीर्तीच्या बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने 15 कोटी डॉलरचे अर्थसाह्य देण्याचे ठरवले असून या लशीचे 10 कोटी डोस भारत व अन्य मध्यम आर्थिक स्थितीतील देशांकरिता उपलब्ध होतील. या लशीची किंमत तीन डॉलर अर्थात सुमारे 225 रुपये इतकी असण्याची शक्यता आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत ही लस बाजारात दाखल होईल. जगभरात आताच्या घडीला कोरोना महामारीच्या संदर्भात निरनिराळे टप्पे दिसत आहेत. चीन, न्यूझीलंड आणि रवांडा या देशांमध्ये रुग्णसंख्या बरीच कमी झाली आहे. या तिन्ही देशांमध्ये निरनिराळ्या कालखंडासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. याउलट अमेरिका आणि ब्राझीलमध्ये रुग्ण आजही वेगाने वाढताना दिसत आहेत. या दोन्ही देशांमध्ये लॉकडाऊन अत्यल्प काळात उठवण्यात आले होते वा मुळात सर्व भागांमध्ये लागूच करण्यात आले नव्हते. एकंदर दक्षतेच्या सवयी लोकांनी किती आपल्याशा केल्या यावर महामारीचा प्रभाव अवलंबून दिसत आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply