Sunday , February 5 2023
Breaking News

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करू नका हो!

की घेतले न हे व्रत अंधतेने। लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने। जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे। बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे॥ या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या मार्गदर्शक काव्यपंक्ती अंदमान येथील सेल्युलर जेलमधून तत्कालीन पेट्रोलियममंत्री मणिशंकर अय्यर यांनी निष्ठूरपणे काढून टाकल्या आणि संपूर्ण भारतात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानणार्‍या तमाम देशभक्तांचा संताप झाला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला ’जोडे मारो’ हा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सावरकर यांच्याबद्दलचे प्रेम, त्यांच्याबद्दलची भावना आणि राष्ट्रभक्ती ओतप्रोत भरलेले समस्त देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने तेथे हजर होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित मराठी व हिंदी भाषांत ख्यातनाम संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांनी पूर्ण लांबीचे चित्रपट तयार केले होते. या चित्रपटाची रिळे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक दादर येथून प्लाझा चित्रपटगृहात मिरवणुकीने नेण्याचा कार्यक्रम यापूर्वी झाला होता. त्याच वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चिरंजीव विश्वासराव सावरकर यांचा चांगला परिचय झाला होता. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मणिशंकर अय्यरच्या पुतळ्याला जोडे मारण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा योगायोगाने विश्वासराव शिवाजी पार्कच्या जवळून जात असताना नजर अचानक त्यांच्याकडे गेली. धावतच गेलो आणि विश्वासरावांना घेऊन आलो. मालाडचे पदाधिकारी अशोक पटेल यांना सांगून विश्वासराव सावरकर यांना व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळ पाठविले. या कार्यक्रमाला एक वेगळी शान प्राप्त झाली. बाळासाहेबांनी विश्वासराव सावरकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विश्वासराव भारावले. एका हिंदुहृदयसम्राट सुपुत्राचा दुसर्‍या हिंदुहृदयसम्राटांच्या हस्ते सत्कार झाला.

या सर्व गोष्टींची आठवण यासाठी की झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अल्पकालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी मैं राहुल गांधी हूं, राहुल सावरकर नहीं। अशी मुक्ताफळे उधळली आणि देशात पुन्हा एकदा सावरकर हा विषय पेटला. मुळात राहुल यांच्याकडून सावरकर यांच्यासंदर्भात काही चांगले वक्तव्य ऐकण्याची भारतातील 130 कोटी नागरिकांनी अपेक्षा बाळगणे हीच चूक आहे. सावरकर यांची संपूर्ण कारकीर्द, जीवनसंघर्ष, स्वातंत्र्यलढा या सर्वच गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी राहुल गांधी यांना एक जन्म पुरणार नाही. किमानपक्षी स्वतःच्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात जे गौरवोद्गार काढले होते त्याची तरी माहिती जाणून घेतली तरी ते वाट्टेल ते बरळणार नाहीत.

अटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान असताना डॉ. मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते. त्या वेळी चित्रकर्ती चंद्रकला कुमार कदम यांनी तयार केलेले भव्य तैलचित्र संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या एका छोटेखानी पुस्तिकेच्या रंगीत पानावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल गौरवोद्गार काढलेले पत्र प्रसिद्ध करण्यात आले होते. राहुल गांधी हे खासदार असल्याने त्यांना ही पुस्तिका सहज पाहता येऊ शकेल. अर्थात तशी इच्छाशक्ती असायला हवी. राहुल गांधी यांना कदाचित स्मृतीभ्रंशाचा रोग जडला आहे की काय अशी शंका येते. कारण सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर या महोदयांनी माफी मागितली असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मग ती माफी मागणारे राहुलच होते ना?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात काढलेल्या उद्गारांमुळे जर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यामुळे राहुल गांधी यांना माफी मागावी लागली असेल, तर मग स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा घोर अपमान केल्याबद्दल कोणती शिक्षा द्यावी? एका अर्थाने राहुल गांधी म्हणतात ते बरोबरच आहे. ते सावरकर नाहीत. कारण एकूणच त्यांचा लौकिक, त्यांची पार्श्वभूमी पाहता ते सावरकर असूच शकत नाहीत आणि हे नियतीने केलेले या भारतवर्षावरचे सर्वांत मोठे उपकार म्हणावे लागतील. यानिमित्ताने स्वतःला डाव्या विचारसरणीचा म्हणवून घेणार्‍या प्रत्येकाने आपली सावरकरविरोधाची खाज भागवून घेतली असल्याचे दिसून आले. तुम्हाला सावरकर यांच्याबद्दल प्रेम, जिव्हाळा, सन्मान, गौरव आदी चांगल्या गोष्टी बोलायच्या नसतील तर बोलू नका, पण त्यांची टिंगलटवाळी, अवहेलना, कुचेष्टा, विटंबना तरी करू नका.

लोकशाहीत आचार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य जरी असले तरी त्याचा स्वैराचार करू नका. त्यांनी देशासाठी केलेल्या कामाची नोंद घेऊन कृतज्ञता बाळगण्याचा दिलदारपणा दाखवा. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित झाले आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ’भारतरत्न’ देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करणारा प्रस्ताव संमत करून घ्यावा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेऊन त्यांच्याकडे एकमुखी मागणी करावी. पंतप्रधान मोदी यांनी येत्या 26 जानेवारी 2020 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न किताब जाहीर करून तमाम देशवासीयांच्या भावनांची पूर्तता करावी, ही अपेक्षा.

जम्मू-काश्मीरबद्दलचे 370 कलम, अयोध्येत प्रभूरामाचे भव्य मंदिर हे दोन्ही मुद्दे मार्गी लागले आहेत. आता देशातील सध्याचे अशांततेचे वातावरण शांत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घ्यावा. सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन मार्ग काढावा. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ’भारतरत्न’ घोषित करून 130 कोटी भारतीयांचा स्वाभिमान शतगुणित करावा. सावरकर यांच्या मुद्द्यावर समाजमाध्यमातून जशी विरोधी वक्तव्ये पाहायला मिळाली तशीच काही जुनी थोरामोठ्यांची भाषणेही ऐकायला मिळाली. अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्या जुन्या भाषणांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची थोरवी वर्णन करणार्‍या व्हिडीओ क्लिप्स ऐकायला मिळाल्या. या सर्वांचे संकलन अर्थातच दादर येथील सावरकर स्मारकाच्या कार्यालयात उपलब्ध असेल. तथाकथित टीकाकारांनी या बाबींचासुद्धा परामर्श घेऊन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.

न जाणो त्यांचे मत-मन परिवर्तन होईल. हे ईश्वरा, ही सद्बुद्धी अशा समस्त टीकाकारांना आणि निरीश्वरवादी महानुभावांना देवो. या देशात सर्वांना गुण्यागोविंदाने राहण्याची प्रार्थना करण्याची ’हीच वेळ आहे!’ जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरू वामनराव पै यांनी विश्व प्रार्थनेत म्हटल्याप्रमाणे ’हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव; सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे!

-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply