Breaking News

गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांचे गावांकडे आगमन

मुरूड ः प्रतिनिधी

मुरूड तालुक्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात नाही, परंतु प्रत्येक घरात गणपती विराजमान होतो. मुरूड पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे 25 हजार दीड, पाच व 10 दिवसांच्या गणपतींची संख्या आहे. बाहेरगावी कामासाठी स्थायिक झालेले भाऊ, काका, मामा यांचा सर्व परिवार खासकरून गणेशोत्सवासाठी येत असतो. त्यामुळे मुरूड तालुक्यात नेहमीपेक्षा जास्त गर्दी होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही यंदा गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र ओसंडून वाहत आहे. मुंबई, ठाणे, बोरिवली, विरार, पुणे येथे राहणारे चाकरमानी लॉकडाऊनमध्ये आपल्या गावीच आले आहेत, तर विविध ठिकाणी इंजिनिअरिंग अथवा तांत्रिक ज्ञान मिळविण्यासाठी बाहेरगावी गेलेली सर्व मुलेही आपल्या गावीच असल्याने गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. उर्वरित अडकून पडलेली काही मंडळी आपल्या गावी परतण्यास उत्सुक असून शासनाच्या सर्व अटी-शर्तींची पूर्तता करून आपल्या मूळगावी येणार आहेत. मुंबई, ठाणे या शहरांत कामाला असलेल्या माणसांची संख्या हजारोंवर असल्याने सर्वच जण गणेशोत्सव शासनाच्या नियमांप्रमाणे साध्या पद्धतीने साजरा करणार आहेत. जून महिन्यातच गणपती कारखानदारांकडे ऑर्डर बुक केल्याने आपल्या गणरायाचे कलर काम कसे केले हे पाहण्यासाठी लोक गणपती कारखान्यात जात आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन-तीन महिन्यांपासून मूर्ती बनविण्यास कारागिरांनी सुरुवात केली होती. कारागीर आता मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याच्या कामात मग्न आहेत. मुरूड शहरात शाडूच्या गणेशमूर्तींना खूप मागणी आहे. यंदा कोरोनामुळे जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका मूर्तिकारांनाही बसला आहे. दरम्यान, मुरूड नगर परिषदेने गणेशोत्सवाबाबत नियमावली तयार केली असून नागरिक त्याची अंमलबजावणी करणार आहेत.

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply