Breaking News

हरयाणा स्टीलर्सकडून गुजरात फॉर्च्युन जाएंटचा धुव्वा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात गुजरात फॉर्च्युन जाएंट संघाची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. दिल्लीच्या त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या सामन्यात हरयाणाने गुजरातवर 41-25ने मात केली. बचाव फळीचे अपयश सामन्यात गुजरातला पुन्हा एकदा महागात पडले. हरयाणाच्या खेळाडूंनी मात्र अष्टपैलू खेळ करत गुणतालिकेत तिसर्‍या स्थानावर झेप घेतली.

सामन्याच्या पहिल्या सत्रापासूनच हरयाणाने सामन्यावर आपले वर्चस्व ठेवले होते. गुजरातचे खेळाडू हरयाणाच्या चढाईपटूंपुढे तग धरू शकले नाहीत. गेले दोन हंगाम भक्कम बचावाच्या जोरावर अंतिम फेरी गाठणारा गुजरातचा संघ या हंगामात पूर्णपणे उघला पडला आहे. उजव्या आणि डाव्या कोपर्‍यातून होणार्‍या चढायांवर रोख लावणे गुजरातच्या बचाव फळीला जमले नाही. ऋतुराज कोरावी, परवेश भैंसवाल, सुनील कुमार हे बचावपटू हरयाणाविरुद्धच्या सामन्यात अजिबात छाप पाडू शकले नाहीत. गुजरातकडून बचाव फळीत अबुफजल मग्शदुलू, जी. बी. मोरे यांनी चांगली कामगिरी केली, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.

हरयाणाच्या खेळाडूंनी मात्र सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. विकास कंडोला, प्रशांत कुमार राय आणि विनय या चढाईपटूंनी आक्रमक चढाया करत गुजरातच्या बचाव फळीला खिंडार पाडले. या आक्रमक खेळापुढे गुजरातचा संघ तग धरू शकला नाही. बचाव फळीत रवी कुमार आणि विकास काळेनेही काही चांगल्या पकडी करत गुजरातच्या चढाईपटूंचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. सामना संपायला काही मिनिटे बाकी असताना गुजरातने चांगले पुनरागमन केले होते, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या पराभवानंतर गुजरात गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply