नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांच्याकडे तक्रार केल्याची धक्कादायक माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. यामुळे कोहलीसह सर्वच खेळाडूंना टीकेला सामोरे जावे लागले. कोहलीने काही आठवड्यांपूर्वीच खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन आणि फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे कारण देत भारताच्या ट्वेन्टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याच्या या निर्णयामागे संघातील वरिष्ठ खेळाडूंचा हात असल्याची बाब समोर आली आहे.
रहाणे आणि पुजारा त्या वेळी सुमार कामगिरी करत होते. त्यामुळे कोहलीने ड्रेसिंग रूममध्ये त्यांची कानउघाडणी केली. संघातील फलंदाज धावफलक हलता ठेवत नाहीत, तसेच गोलंदाजांना घाबरून खेळत असल्याने गोलंदाज वर्चस्व गाजवतात, असे कोहली पराभवानंतर म्हणाला होता. यानंतर रहाणे, पुजाराने शहा यांच्याशी संवाद साधला. याशिवाय ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर कोहलीच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाबाबत बीसीसीआय चर्चा करणार आहे, असेही समजते.