Breaking News

पोलादपुरातील रस्ते-पूल दळणवळण सुविधा असुविधाजनक!

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, असे तंतोतंत वर्णन शोभू शकेल, असा दुर्गम, डोंगराळ, पोलादपूर तालुका. तालुक्यात रस्ते-पूल अशी दळणवळण सुविधा उपलब्ध असली, तरी त्यांची अवस्था पाहता असुविधाच अधिक असल्याचे सकृतदर्शनी जाणवते. येथे ब्रिटिशकाळात गोव्याकडे आणि महाबळेश्वरकडे जाणारे दोन रस्ते आणि त्यावरील पूल अस्तित्वात आले. हे रस्ते अरूंद असले, तरी दुर्गमतेचा विचार करून वाहनांस सुकर बांधण्यात ब्रिटिश अभियंत्यांचा कस लागला. या दोन रस्त्यांव्यतिरिक्त उर्वरित तालुक्यातील जनता डोंगरदर्‍यांतून, राने-वने, कडे-कपारी, नदीतील दगड-गोटे तुडवित पायीच प्रवास करीत होती. रस्ते गावांपासून शेतापर्यंत बैलगाडी घेऊन जाण्याइतपतही रूंदीचे नव्हते. त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर रस्तेवाहतुकीचे जाळे निर्माण करणे एक आव्हानच होते. सुदैवाने त्या काळातच बॅ. अंतुले हे रस्ते बांधकाम मंत्री कोकणच्या आणि तत्कालीन कुलाबा जिल्ह्याच्या विकासास उपयोगी ठरले. पोलादपूर तालुक्यातील पंचायत समितीचे तत्कालीन सभापती बंधुजीराव पालांडे यांनी बॅ. अंतुले यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे पोलादपूरनजीकच्या दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलजवळून देवपूर, पैठण ते कोतवाल असा पहिला रस्ता तयार झाला. याच काळात ब्रिटिशांनी तयार केलेल्या महाबळेश्वर मार्गावरील कापडे येथून उमरठपर्यंतचा रस्ताही बॅ. अंतुले यांनी मंजूर केला. तेथील साखरजवळचा पूल तर केवळ 12 दिवसांत उभारून त्या काळातील अभियंत्यांनी चमत्कार केला. जो आजही भक्कमपणे उभा आहे. मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17 पोलादपूरमार्गे नेण्याकामी पेणचे भाई शेट्ट्ये यांच्या छोट्याशा सूचनेनंतर बॅ. अंतुले यांनी महाडहून पोलादपूर व तेथून कशेडी घाटमार्गे भरणानाका खेडपर्यंत असा रत्नागिरीमध्ये नेला.

यानंतर तालुक्यातील माटवण, सवाद, धारवली, कालवली हा रस्ता महाड तालुक्यातील निरादेवधर पंढरपूर रस्त्यालगत स्व. शांताराम फिलसे यांच्या काळात झाला. दिविल आणि तुर्भे येथे जाण्यासाठी कोल्हापुरी तंत्राचे बंधारेवजा पूल उभारून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या काळात रस्ता झाला. कोंढवी गोलदरा मार्गे पळचिल या रस्त्याची निर्मिती जिल्हा परिषदेमार्फत झाली. मोरगिरीचा रस्ताही जिल्हा परिषदेमार्फत झाला. उंबरकोंड, पवारवाडी, चरई हे रस्ते जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले. रानवडी, घागरकोंड, बोरावळे हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून झाला. जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आलेल्या रस्त्यांचे आणि पुलांचे बहुतांशी श्रेय तत्कालीन उपाध्यक्ष माणिक जगताप यांना जाते. गोळेगणी, परसुले क्षेत्रपाळपर्यंत रस्ता नेल्यावर अतिदुर्गम कुडपणच्या रस्त्यासाठी तत्कालीन उपाध्यक्ष माणिक जगताप आग्रही होते. माजी ग्रामविकास मंत्री प्रभाकर मोरे यांनी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षा अपेक्षा कारेकर यांच्या माध्यमातून कुडपण येथे रस्ता करण्यासाठी डोंगरातून दुसरा मार्ग काढला, पण तोदेखील अपूर्ण राहिला.

25 जुलै 2005 रोजी झालेल्या अतिवृष्टीतील महापूर व भूस्खलनानंतर  तालुक्यातील दळणवळणच ठप्प होण्याची वेळ आली. ज्यांनी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या काळात तालुक्यातील रस्ते आणि पुलांचे जाळे विणले त्यांना आमदारपदाच्या सुरुवातीस ते उद्ध्वस्त अवस्थेतून पुन्हा साकारण्याची वेळ आली. या आव्हानाला सामोरे जाताना आ. जगताप यांनी प्रथम पैठणच्या वाहून गेलेल्या पुलाच्या जागी पूल साकारण्याचा संकल्प केला. जिल्हा परिषदेमार्फत तेथे एक मोरी बांधून केविलवाणी राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न झाला. पहिल्याच पावसात तो रस्ता वाहून गेला. गौरीगणपतीच्या सणाला चाकरमानी पैठणपासून पुढील गावांमध्ये जाऊ शकले नाहीत, तर फारच मोठी गैरसोय होईल, हे लक्षात घेऊन अभियंत्यांना माजी आ. जगताप यांच्या सांगण्यावरून गतिमान बांधकाम करीत एक मजबूत पूल केवळ 90 दिवसांच्या आत उभारून तो गणपतीपूर्वीच वाहतुकीस खुला केला. कोतवालजवळच्या पुलाचे काम या पाठोपाठ सुरू झाले.  पंचायत समितीच्या अभियंत्यांनी तालुक्यातील वाहून गेलेल्या रस्त्यांचे व पुलांचे अंदाजपत्रक अतिवृष्टीकालीन विकासकामांच्या आराखड्यामध्ये अत्यल्प ठेवल्याने फारच कमी कामे होऊ शकत होती. त्यामुळे आ. जगताप यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय येथे आणून तालुक्यातील महाबळेश्वर वाई सुरूर, तसेच पोलादपूर ते ओंबळी जननी खिंडमार्गे खेड हे रस्ते राज्य सरकारकडे वर्ग केले. डेप्युटी अभियंता गोसलवाड आणि कनिष्ठ अभियंता सुतार, जेट्टे आदी मेहनती अभियंते या कार्यालयास भेटले. दरम्यान, आमसभेमध्ये तालुक्यातील जे रस्ते जिल्हा परिषदेला करता आले नाहीत ते राज्य सरकारकडे वर्ग करण्याचा ठराव मांडला. त्यास आमसभेची मंजुरी मिळूनही जिल्हा परिषदेने वेगळा ठराव मांडल्याने तालुक्यातील अतिवृष्टीमध्ये वाहून गेलेले रस्ते पूर्ववत होण्याची शक्यता दुरावली. दरम्यान, जिल्हा नियोजन मंडळात माजी आ. जगताप यांनी पाठपुरावा करून कापडे ते कामथे या रस्त्यासाठी मंजुरी घेतली. केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांता पाटील यांनी या रस्त्यासाठी विशेष बाब म्हणून पाच कोटींच्या निधीची तरतूद केली. जिल्हा परिषद या कामाची एजन्सी असल्याने या रस्त्याचे काम सुरू झाले, पण रस्त्याचे नियोजन अभियंत्यांनी काळजीपूर्वक केले नसल्याने या मार्गावरील कापडे ते वाकण दरम्यानच्या घोडवती नदीवरील पुलाचे काम अद्याप कामाची मुदत संपूनही पूर्णत्वास गेलेले नाही, तर साखर येथील पूल अतिवृष्टी काळात कमकुवत झाला असूनही त्याचा या कामात समावेश झाला नाही. या दोन पुलांमधील एका पुलासाठी घेतलेले वळण अनावश्यक आहे, तर अन्य एका पुलाच्या कामास सुरुवातही झाली नाही. रस्त्यावरील डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे आहे. ठेकेदाराने माणसे काढून घेतल्याने काम मंद झाले आहे, मात्र या कापडे ते कामथे रस्त्याचे श्रेय जिल्हा परिषदेचे बांधकाम खात्याचे पदाधिकारी स्थानिक खासदारांना देत असल्याने आता आ. जगताप यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे.

महादेवाचा मुरा, बावळी ऊर्फ रानकडसरी, शेलारांचे कुडपण, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणदिवीलगतच्या डोंगराचे झालेले भूस्खलन, ग्रामीण रुग्णालयासमोरच्या अपघातप्रवण रस्त्याचे काम, काटेतळी ते नागाव हा रस्ता अशी कामे करताना आ. जगताप यांनी मतांऐवजी माणसांचा विचार केलेला दिसतो. याखेरीज तालुक्यातील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण आ. जगताप यांच्या काळात होत आहे अथवा झाले आहे. रायगड जिल्हा परिषदेमार्फतही विविध रस्त्यांच्या कामांची सुरुवात झाली, मात्र अभियंत्यांनी दर्जा नियंत्रणाचे काम व्यवस्थित केले नसल्याने बिले अदा केली जाऊनही रस्ते अभावानेच पूर्णत्वास गेल्याचे दिसून येत आहे. पोलादपूर शहरातील रस्त्याचे भूमिपूजन तत्कालीन पालकमंत्री तटकरे यांच्या हस्ते 27 फेब्रुवारीला झाल्यानंतर या कामास सुरुवात झालेली दिसत आहे, मात्र पालक मंत्र्यांच्याच हस्ते नळपाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन होऊनही ते काम सुरू झाले नसल्याने हा रस्ता पाईपलाईन करतेवेळी उखडला जाण्याची चिन्हे दिसत आहेत. अतिवृष्टी काळात पोलादपूरच्या संरक्षक भिंतीचे काम जुना महाबळेश्वर रस्त्यालगत जेथे भूमिपूजन झाले त्या लोकवस्तीऐवजी लोकवस्ती उंचावर असलेल्या ठिकाणी उत्तरवाहिनी सावित्री नदीमध्ये झालेले दिसते. परिणामी लोकवस्तीचा पुराच्या पाण्याचा धोका कायम राहिला आहे. तुटवली परसुले या भागात अतिवृष्टीग्रस्त रस्त्यांची दुरुस्ती म्हणावी तशी दिसत नाही. दिविलचा के. टी. बंधारा वाहून गेला आहे. तुर्भे के. टी. बंधारावजा पूल कमकुवत झाल्याने दुरुस्ती झाली, पण तो पुराच्या पाण्याखालीच राहिला आहे. कोंढवीची अतिवृष्टीग्रस्त मोरी डागडुजी होऊनही कोसळली, पण पुन्हा उभारताना त्यामध्ये सिमेंटचा वापर नगण्य झाला आहे.

अतिवृष्टीच्या कामांचा निधी पोलादपूरमध्ये योग्य तर्‍हेने विनियोग न झाल्याने निरुपयोगी ठरला आहे. राजकारणामुळे हावरे ते दिविल रस्ता केवळ शंभर मीटर्स अंतराच्या भूसंपादनाअभावी पूर्ण होऊ शकत नाही. चरईच्या कै. रामचंद्रबुवा जाधव यांनी डोंगरी विकासमधून पाठपुरावा केल्यानंतर माजी मंत्री प्रभाकर मोरे यांच्या कालावधीत पूर्ण झालेला पूलही अतिवृष्टी काळात काही ठिकाणी संरक्षक कठडे वाहून गेल्याने धोकादायक झाला, तर अ‍ॅप्रोच रोडही वाहून गेल्याने संपर्कहीन झाला, मात्र तो अ‍ॅप्रोच रोड करते वेळी मोरी बांधण्याची आवश्यकता असूनही तसे केले गेले नाही म्हणून उत्तरवाहिनी सावित्री नदीच्या पुराचे पाणी पोलादपूर शहरात उलट्या दिशेने फिरते.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply