नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन शक्ती’ अभियानांतर्गत क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडण्यात यश मिळवले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाद्वारे दिली. अंतराळात अशा स्वरूपाची कामगिरी करणारा भारत हा अमेरिका, चीन आणि रशियानंतर जगातील चौथा देश ठरल्याचेही मोदींनी सांगितले.
‘मिशन शक्ती’बाबत अधिक माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आमच्या शास्त्रज्ञांनी 300 किमीच्या अंतरावर असलेल्या ‘लो अर्थ ऑर्बिट’मधील एका उपग्रहावर मारा करून तो पाडला. ही मोहीम फक्त तीन मिनिटांत फत्ते झाली. सर्वच भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. हा पराक्रम भारतातच तयार करण्यात आलेल्या ए-उपग्रह क्षेपणास्त्राद्वारे केला गेला, असे म्हणत पंतप्रधानांनी या अभियानाशी संबंधित सर्वांचे अभिनंदन केले.
अत्यंत महत्त्वाचे पाऊल
भारताने केलेल्या अंतराळातील लक्ष्यभेदाद्वारे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन झालेले नाही. या अभियानाचा उपयोग देशातील 130 कोटी जनतेची सुरक्षा आणि शांततेसाठीच करणार आहोत, असे सांगून आमच्या भविष्यातील सुरक्षेसाठी आज उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून शास्त्रज्ञांसह पंतप्रधानांचे अभिनंदन
मुंबई : भारतीय बनावटीच्या ए-सॅट (अँटी सॅटेलाईट) क्षेपणास्त्राच्या सहाय्याने यशस्वी करण्यात आलेल्या मिशन शक्तीमुळे अंतराळ क्षेत्रात भारताची ताकद वाढल्याचे जागतिक स्तरावर सिद्ध झाले असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोहिमेतील शास्त्रज्ञांचे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.