खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन, प्लेसमेट सेल, समुपदेशन केंद्र व अंतर्गत गुणवत्ता सिदधता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 5) सकाळी 10 ते 4 या वेळेत कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या. कॅम्पस मुलाखती घेण्यासाठी अॅक्सीस बँकेचे सर्व पदाधिकारी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आले होते. या मुलाखतीसाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मुलाखतीसाठी उपस्थित होते. अॅक्सीस बँकेच्या सर्व पदाधिकार्यांनी अर्जधारकांच्या अर्जाची योग्य पध्दतीने छाननी केली व मुलाखतीसाठी पात्र असणार्या अर्ज धारकांची निवड केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करिअर मार्गदर्शन केंद्र व प्लेंसमेट सेलचे समन्वयक प्रा. रेवण शिंदे, प्रा. महेश्वरी झिरपे व सर्व प्राध्यापक वृंद व कर्मचारी वर्ग या सर्वांमुळे कॅम्पस मुलाखती यशस्वीरित्या झाल्या. कॅम्पस मुलाखतीचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, उपाध्यक्ष वाय. टी. देशमुख व सचिव डॉ. सिदेश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.