Breaking News

अल्पवयीन मुलाला लुटणार्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक

पनवेल : वार्ताहर, बातमीदार

खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरात एका अल्पवयीन मुलास जबरीने लुटीचा प्रकार घडला होता. नवी मुंबई गुन्हे शाखेचा कक्ष क्रमांक दोनच्या पथकाने दोन दिवसांत हा गुन्हा अत्यंत शिताफीने उघडकीस आणला. याप्रकरणी पोलीसांनी दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. त्यांनी इतर गुन्ह्यांची ही कबुली दिली.

10 सप्टेंबर रोजी रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या कडून खांदा कॉलनीकडे जाणारे रस्त्यावर 17 वर्षीय मुलास जबरीने लुटण्यात आले. त्याच्याकडील  17,999 रुपये किंमतीचा रियल मी कंपनीचा प्रो मॉडेलचा  मोबाइल फोन हिसकावून घेण्यात आला. या प्रकाराबाबत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, सह पोलीस आयुक्त डॉ. जय जाधव, गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त  प्रविणकुमार पाटील, सुरेश मेंगडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांनी हा गुन्हा विनाविलंब उघडकीस आणण्यासाठी  मार्गदर्शन केले. या गुन्हयातील आरोपींनी शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षे वयाचे अल्पवयीन बालकास जबरीने लुटलेले असल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेण्यात आले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक 2ने समांतर तपास सुरू केला. दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक शरद ढोले यांना आरोपींबाबत काही गोपनीय माहिती मिळाली.

त्या अनुषंगाने अनुषंगाने ढोले, सहायक पोलीस निरीक्षक संदीप गायकवाड आणि त्यांच्या पोलीस पथकाने कळंबोली ब्रिज खाली सापळा लावला. त्यादरम्यान राजू राजेश्वर सोनी उर्फ भैया (28, रा. कळंबोली) व अशोक लक्ष्मण गाडेकर (30, रा. खांदा कॉलनी, नवीन पनवेल) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता दोघांनीही संबंधित गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच गुन्हा करताना वापरलेली वॅगनर मोटार कार (क्र. एमएच 46 बीबी 8722) किंमत अंदाजे 2,50,000 रुपये ही कळंबोली परिसरातून ताब्यात घेण्यात आली. अटक आरोपींना पुढील तपासकामी कामोठे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

संबंधित आरोपी हे सराईत असून राजू सोनी उर्फ भैया याचेवर यापुर्वी शहर पोलीस ठाणे येथे तीन, कळंबोली पोलीस ठाणे येथे तीन, तुर्भे पोलीस ठाण्यात एक असे एकूण सात चोरीचे गुन्हे दाखल आहे. तर अशोक गाडेकर या आरोपीवर शहर पोलीस ठाण्यात एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटामध्ये कळंबोली सारख्या गजबललेल्या ठिकाणाहून पोलिसांनी आरोपींना अत्यंत शिताफीने अटक केली.

हा गुन्हा उघडकीस आणण्याची उल्लेखनीय कामगिरी पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, सहायक पोलीस निरीक्षक शरद ढोले, सहायक पोलीस निरीक्षक संदीप गायकवाड, पोलीस हवालदार सचिन पवार, रणजित पाटील, पद्मसिंग पवार, पोलीस नाईक प्रफुल्ल मोरे, सम्राट डाकी, सुनिल कुदळे आणि पथकातील इतर कर्मचार्‍यांनी केले. या गुन्हयाचा पुढील तपास कामोठे पोलीस ठाण्याच्या मार्फत करण्यात येत आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply