कर्जत ः बातमीदार
लॉकडाऊन कालावधीत मीटर रीडिंग न घेतल्याने वीज ग्राहकांना विजेचे सरासरी बिल पाठविण्यात आले, मात्र आता तीन महिन्यांनी मीटरचे रीडिंग घेऊन पाठविलेल्या बिलांत या सरासरी बिलाचे समायोजन करण्यात आले नाही. त्यामुळे बिलांमधील विविध प्रकारचे टॅक्स हटविण्यात यावे, अशी मागणी नारीशक्ती महिला संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे. नारीशक्ती महिला संघटनेच्या वतीने वीज वितरण कार्यालयावर धडक देण्यात आली. वीज बिलांचे भरमसाठ आकडे बघून वीज ग्राहकांना ’शॉक’ बसला आहे. हे बिल सुलभ हप्त्यात भरा, अशी मखलाशीही वीज वितरण कार्यालयातून केली जाते. त्याच वेळी रीडिंगद्वारे आलेल्या बिलात ’समायोजन’ करण्यात आले आहे, असे महावितरण वारंवार सांगत आहे, मात्र प्रत्यक्षात हे समायोजन भरलेल्या बिलाचे नसून फक्त युनिट श्रेणींचे केले जात आहे. ऑगस्ट महिन्यात आलेले बिल तीन महिन्यांचे असल्याने एकूण वीज वापर तीन महिन्यांत विभागून त्यानुसार दरनिश्चिती केली जात आहे, पण भरलेल्या बिलाचा त्यात विचार नसल्याने ही ग्राहकांची अधिकृत दुहेरी लूट ठरत आहे. या बिलात लॉकडाऊन कालावधीत भरलेल्या सरासरी बिलाचे कुठलेही ठोस समायोजन करण्यात आले नाही. त्यामुळे सरासरी वीज बिल देणार्या महावितरणला जनतेच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात कर्जत तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत नारीशक्तीने महावितरण कार्यालयात जाऊन नरीशक्तीचा आवाज अधिकारीवर्गासमोर बुलंद केला. संतप्त महिलांनी अभियंता आनंद घुले यांच्याशी वाढीव बिलांसंदर्भात चर्चा केली. वीज बिलांत समायोजन करून त्यात स्थिर आकार कर, वीज आकार कर, वाहन आकार कर, इंधन समायोजन कर, वीज शुल्क कर, वीजविक्री कर, व्याज असे विविध प्रकारचे कर रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या वेळी अर्चना हगवणे, रुचिता कडू, स्वीटी बार्शी, माधवी बंदरकर, ज्योती जाधव, शालिनी लोहारे, नीता केरकर, सुप्रिया मोरे, वर्षा डेरवणकर आदी महिला उपस्थित होत्या.