पेण ः प्रतिनिधी
शिक्षादानाचे कार्य करताना असतानासुद्धा एक सामाजिक भावनेतून कार्य करण्याचे काम सुरेश अलकुंटे सर यांनी केले असल्याचे गौरवोद्गार पेण न. प. शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी संगीता माने यांनी काढले. पेण नगर परिषद शाळा क्र. 8 चे मुख्याध्यापक सुरेश मसू अलकुंटे यांचा निरोप समारंभ उर्दू शाळा येथे पार पडला, यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पेण नगर परिषदेचे मुख्यधिकारी जीवन पाटील, प्रशासनाधिकारी संगीत माने, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला आघाडी प्रमुख जयश्री म्हात्रे, सरचिटणीस मदन कोळी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी अलकुंटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत सलोख्याचे नाते निर्माण केले पाहिजे. मी जरी सेवानिवृत्त झालो असलो तरी आपल्याला ज्यावेळी माझी मदत लागेल त्यावेळी तात्काळ आपण हजर राहणार असल्याचे सांगितले.
उपस्थित शिक्षकांनीसुद्धा आपल्या मनोगतातून अलकुंटे सर यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. सुरेश अलकुंटे यांना शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दशरथ एरणकर यांनी केले.