आरोग्यप्रहर
व्यायाम म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर पैलवान किंवा पीळदार शरीरे येतात. असे होण्यासाठी तर व्यायाम लागतोच, पण निरोगी राहण्यासाठीही व्यायाम लागतो हे अनेकांना माहीतच नसते. भारतीय समाजामध्ये व्यायामाची आवड कमी आहे. सुशिक्षित सुखवस्तू समाजात तर व्यायामाची आवड अगदीच कमी आहे. भारतातील जातीव्यवस्थेमुळे कष्टकरी वर्गाला अन्न कमी, तर खाणार्यांना श्रमच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे धट्टीकट्टी गरिबी म्हणण्याची वेळ आपल्यावर आली आहे. म्हणूनच आपल्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यायाम केला नाही तर आपणास अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.
व्यायाम न करण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. एकूण शारीरिक क्षमता, सहनशक्ती कमी होते. अपेक्षित आयुष्य कमी राहते. हृदय लवकर जीर्ण आणि दुबळे होते. सांधे आखडणे आणि स्नायू दुबळे होतात. रक्तातील साखर वाढून मधुमेह होण्याची शक्यता बळावते. शरीरात चरबी साठणे, पोट सुटणे, शुद्ध रक्तवाहिन्यांत चरबीचे थर साठतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांत अडथळे निर्माण होतात. भूक आणि पचनशक्ती मंदावते.
व्यायामाचे महत्त्व- जे लोक व्यायाम करीत नाहीत त्यांना आज ना उद्या आरोग्यसमस्या जाणवतील. या सर्व हळूहळू वाढणार्या समस्या असल्याने त्यांची मनुष्याला सवय होऊन जाते. व्यायाम न करणेही आपल्या अंगवळणी पडते. अनेक जण आपल्या अंगी असलेल्या या आळसाचे समर्थन करताना दिसतात. व्यायामाची आवड लहानपणापासूनच लावली पाहिजे. प्रत्येकाने काही ना काही व्यायाम आयुष्यभर नियमित करायला पाहिजे.
व्यायाम म्हणजे नेमके काय हेही समजायला हवे. केवळ थोडेफार चालणे यालाच अनेक जण व्यायाम समजतात. व्यायामाचे अनेक प्रकार आहेत. सर्व दृष्टीने फायदेशीर होईल असे व्यायाम शोधून ते चिकाटीने नियमित करणे आवश्यक आहे. व्यायामाचे शास्त्र नीट समजावून घेऊन त्याप्रमाणे आचरण केल्यास आपल्याला निरोगी आयुष्याची प्राप्ती होऊ शकते.