Breaking News

वीज कनेक्शन तोडणीला स्थगिती

भाजपच्या दणक्याने लाखो नागरिकांना दिलासा

मुंबई : प्रतिनिधी
कोरोना काळात पाठविण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांचा मुद्दा विरोधी पक्ष भाजपने मंगळवारी (दि. 2) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदारपणे उपस्थित केला. वीज बिले थकल्यामुळे राज्य सरकार शेतकर्‍यांचा वीजपुरवठा खंडित करतेय. सरकारच्या जुलमी निर्णयाविरोधात भाजप आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत सुरुवातीला विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून निषेध नोंदविला. त्यानंतर सभागृहात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी केली. यावरून सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मध्यस्थी करीत वीजतोडणी कारवाईला स्थगिती देत असल्याची घोषणा केली.
सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजप आमदारांनी विधिमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले. वाढीव बिलांसंदर्भातील फलक झळकावत भाजपने या मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधून घेतले. सर्वसामान्य नागरिकांच्या वीज कनेक्शनसह कृषिपंपांची वीज तोडण्याची कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी वाढीव वीज बिलाचा मुद्दा उपस्थित केला.
वाढीव वीज बिल मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत चर्चा घेण्याची मागणी केली. राज्यात वीज कनेक्शन कापली जात आहेत. कोरोनामुळे संकटात आलेल्या नागरिकांना अडचणीत आणले जात आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, राज्य सरकारच्या वतीने मी सांगू इच्छितो की, जोपर्यंत ऊर्जा विभागाची वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा होत नाही, तोपर्यंत शेतकर्‍यांचे, सर्वसामान्यांचे वीज कनेक्शन तोडणे थांबवण्यात येईल. यासंदर्भात चर्चेतून सर्व सदस्यांचे समाधान झाल्यानंतर वीज बिलाच्या मुद्द्यासंबंधातील निर्णय घेण्यात येईल.
पवारांनी वीजतोडणी थांबवण्याची घोषणा केल्यानंतर फडणवीस यांनी अजित पवार व सरकारचे आभार मानले. ज्यांची वीज तोडली, त्यांची जोडून द्या. त्यांनाही समान न्याय द्या, अशी माझी विनंती आहे, असे फडणवीस म्हणाले.

Check Also

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या निरंजन डावखरे यांचा अर्ज दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने विद्यमान आमदार …

Leave a Reply