खोपोली ः प्रतिनिधी
सततच्या मुसळधार पावसामुळे बुधवारी (दि. 23) दुपारी 2 वाजता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली. दरडीचा मलबा मुंबई लेनवर पडल्याने तो ढिगारा काढून रोड सुरक्षित करण्यासाठी 20 ते 25 मिनिटे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडील वाहतूक रोखण्यात आली होती.
मंगळवारी खोपोली परिसरात जवळपास 12 तास धुवाँधार पाऊस झाला. त्यामुळे एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली. सुदैवाने या वेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही, मात्र दरडीचा कोसळलेला ढिगारा काढण्यासाठी व पुढील सुरक्षा उपाय म्हणून योग्य ती खबरदारी घेऊन उपाययोजना करण्यासाठी आयआरबीकडून एक्स्प्रेस वेवरील वाहतूक दुपारी 2 वाजता 20 मिनिटांसाठी थांबविण्यात आली होती. अनपेक्षित घडलेल्या या घटनेने एक्स्प्रेस वेवर वाहनांची भलीमोठी रांग लागली होती.