Breaking News

हे आहेत सर्वात मोठ्या कंपनीचे व्यवसाय!

रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे.ती कोणकोणते व्यवसाय करून 15 लाख कोटी रुपये बाजारमूल्य असलेली कंपनी झाली आहे, हे समजून घेतले की पैसा नेमका कोठे फिरतो आहे, हे समजण्यास मदत होते.आजच्या मितीस भारतीय शेअरबाजारामधील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लि. म्युच्युअल फंडांकडं रिलायन्स इंडस्ट्रीजचे एकूण 15.41 कोटी शेअर्स आहेत. नक्कीच त्यामागं भक्कम आशा आहे ती म्हणजे भविष्यात रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या भागधारकांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष फायदा करून देणार. जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतो म्हणजे आपण त्या कंपनीचा एक भाग बनतो आणि त्या कंपनीच्या व्यवसायातील नफ्यामध्ये आपणांस हिस्सा मिळतो. हा हिस्सा जरी थेट मिळत नसला तरी लाभांशाद्वारे तो आपल्याला मिळत असतो आणि कंपनीच्या वृद्धिंगत नफ्यामुळं कंपनीच्या शेअर्सना मागणी वाढते आणि आपसूकच भाव देखील वाढत जातो. शेअरहोल्डर्सना वाढीव मूल्यांकन व लाभांश असे दुहेरी फायदे मिळू शकतात, मात्र त्यासाठी कंपनीवर, तिच्या मालकावर, प्रवर्तकांवर, व्यवस्थापनावर आणि प्रामुख्यानं कंपनी करत असलेल्या व्यापारावर विश्वास असणं गरजेचं ठरतं. गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज असं म्हणतात की, ज्या व्यवसायाबद्दल आपणांस कळतं त्याच व्यवसायात गुंतवणूक करावी, मग ती कोण्या एका कंपनीच्या व्यवसायात लावलेलं थेट भांडवल असो की, एखाद्या कंपनीच्या शेअर्समधील गुंतवणूक. आज आपण पाहुयात रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्यवसाय काय आहेत ते… मागील आठवड्यात आपण रिलायन्स ग्रुपची पायाभरणी पाहिली. आता जाणून घेऊयात की हा कल्पवृक्ष कसा आहे ते.. या कंपनीचे प्रामुख्यानं सहा भाग पडतात. पेट्रोकेमिकल, शोधन व उत्पादन, पेट्रोलियम परिष्करण व विपणन, टेक्सटाईल, रिटेल आणि जियो.      

* पेट्रोकेमिकल – रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल उत्पादक समूह असून जगातील पहिल्या दहापैकी एक आहे. रिलायन्स पॉलिमर, एलॅस्टोमर, पॉलिस्टर, ऍरोमॅटिक्स, फायबर माध्यमं व आधुनिक कॉम्पोझिट्स अशी विस्तृत श्रेणी तयार करते ज्याचा उपयोग खेळणी, घरसजावट, टायर्स, बूट, पेयाच्या बाटल्या, प्रसाधनं, परिधानयोग्य कपडे, पॅकेजिंग, शेती, ऑटोमोटिव्ह, गृहनिर्माण, औद्योगिक आणि आरोग्य सेवा इत्यादी क्षेत्रांमध्ये होतो. रिपोल, रिलीन, रिऑन, रिलपाईप, रिलफ्लेक्स, रिलवूड, रिलक्स, रिलपेट इत्यादी ब्रँडद्वारे या क्षेत्रात आपली ओळख जोपासली आहे.

* शोधन व उत्पादन – रिलायन्स हा एक संतुलित पारंपारिक आणि अपारंपरिक हायड्रोकार्बन आणि त्यासंबंधित गोष्टी हाताळणारा भारतातील सर्वात मोठा समूह आहे. रिलायन्सनं पन्ना मुक्ता आणि मध्य व दक्षिण ताप्ती साठ्यामधील शेल (पूर्वीचं ब्रिटिश पेट्रोलियम) आणि ओएनजीसीसमवेत एक अखंड संयुक्त उद्यमात 30 टक्के भागीदार बनून एक्सप्लोरेशन अ‍ॅण्ड प्रॉडक्शन व्यवसायात प्रवेश केला आहे. रिलायन्सकडं देशांतर्गत कृष्णा गोदावरी आणि महानदी खोर्‍यातील पारंपारिक तेल आणि वायू साठे आणि मध्य प्रदेशातील सोहागपूर (पूर्व) आणि सोहागपूर (पश्चिम) असे दोन कोल बेड मिथेन (सीबीएम) ब्लॉक आहेत. शेल व रिलायन्स यांच्या संयुक्त विद्यमानं भारतातील ऊर्जा क्षेत्रातील ही महत्त्वाची पायाभरणी म्हणता येईल. 

* पेट्रोलियम परिष्करण व विपणन – पश्चिम गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स रिफायनरी ही जगातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण रिफायनरी आहे. विक्रमी वेळेत पूर्ण केली गेलेली ही रिफायनरी तिची क्षमता, डिझाइन, लवचिकता, ऑटोमेशनची पातळी आणि एकत्रीकरणाची पात्रता यांमुळं पेट्रोलियम उत्पादनांचा निव्वळ आयातकर्ता म्हणून असलेली भारताची ओळख आता निव्वळ निर्यातदार म्हणून बदलून देशाची ऊर्जा-सुरक्षा सुनिश्चित केली गेली आहे. एका प्रवाहात साडेबारा लक्ष बॅरेल्स शुद्धीकरण क्षमता असलेल्या या रिफायनरीमधून इंधन जगभरातील अनेक देशांत निर्यात केले जाते. ही कॉम्प्लेक्स रिफायनरी भविष्यासाठी तयार आहे आणि कोणत्याही ग्रेडचं पेट्रोल व डिझेल तयार करू शकते. रिलायन्सकडं जामनगरमधील स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्येही जगातील सहाव्या क्रमांकाची रिफायनरी आहे. या रिफायनरीची प्रक्रिया क्षमता 5.8 लक्ष बॅरेलची आहे.

* टेक्स्टाईल – जागतिक बँकेनं गौरवलेलं नरोडा येथील टेक्स्टाईल संकुल हे जगभरातील आधुनिक संकुलांपैकी आहे ज्यामधून ’ओन्ली विमल’ या ऐतिहासिक ब्रँडद्वारे कापड बाजारात येतं. समांतर गुंफण राखणारी वर्स्टेड स्पिनिंग, सिंथेटिक स्पिनिंग, विणन व प्रोसेसिंग अशा चार पद्धतीद्वारे कापड (फॅब्रिक्स), तयार (ऍपरल्स) व वाहनांमधील सुसज्जीकरण आणि सुशोभीकरण यांसाठी उत्पादनं बनवली जातात. 

जितका समूह मोठा तितका त्याचा आवाका वाढीव, त्यामुळंच अशा या कंग्लोमरेट रिलायन्सचे अजून दोन प्रमूख असलेले व्यवसाय आणि त्यांच्या मूल्यखोज संबंधी जाणून घेऊयात पुढील लेखात.

* सुपरशेअर – आदित्य बिर्ला फॅशन लिमिटेड.

आजच्या घडीस पुरुषांसाठी रेडिमेड ब्रँडेड कपडे म्हटलं की, लुई फिलिप, वॅन ह्यूसन, ऍलन सोली, पीटर इंग्लंड यांच्या पलीकडं आपण विचारच करू शकत नाही. हे सर्व ब्रँड ज्या भारतीय कंपनीचे आहेत त्याचं नाव आहे, आदित्य बिर्ला फॅशन अ‍ॅण्ड रिटेल लिमिटेड, ज्याला पूर्वी पँटालून फॅशन आणि रिटेल लिमिटेड म्हणून ओळखले जायचे. ही मुंबईतील कुर्ला येथे मुख्यालय असलेली भारतीय कपड्यांची रिटेल चेन आहे. 1997 मध्ये कोलकाताच्या गारीयाहट येथे प्रथम पँटलून स्टोअर सुरू करण्यात आलं. मार्च 2020 पर्यंत 160 शहरांमध्ये 350 पँटलून स्टोअर आहेत. मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सनी तब्बल 30 टक्के वाढ नोंदवली (137.4 ते 178.95) आणि मागील सात महिन्यांतील उच्चांक गाठला, कारणही तसंच होतं. फ्लिपकार्ट या ऑनलाइन सेवा देणारी रिटेल कंपनी या कंपनीमध्ये 7.8 टक्के हिस्सा घेत आहे, ज्यासाठी फ्लिपकार्ट 1500 कोटी रुपये मोजायला तयार आहे. याचा उपयोग या कंपनीस आपला व्यवसाय वाढवण्यास व आपला ताळेबंद सुधारविण्यास हातभार लावेल. दैनिक आलेखावर या कंपनीच्या शेअरच्या भावानं ब्रेकआऊट दिलेला असून या बातमीमुळं दीर्घ मुदतीसाठी या शेअरवर बोली लावण्यास हरकत नसावी.

– प्रसाद ल. भावे

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply