Breaking News

मोरबे धरणात यंदा कमी पाणीसाठा

पूर्ण भरण्यासाठी 2300 मिमी पावसाची आवश्यकता

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

जून महिना कोरडा गेल्याने नवी मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या मोरबे धरणाची पाणी पातळी खालावली होती, मात्र मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरण पातळी चांगलीच वाढली आहे. धरणात आतापर्यंत 60 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर धरण शंभर टक्के भरण्यासाठी आणखी 2300 मिमी पावसाची आवश्यकता आहे.

मोसमी पावसाचे आगमन झाल्यानंतर पूर्ण जून महिना पावसाने दडी मारली होती. त्यामुळे राज्यात पाणी संकट निर्माण झाले होते. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या मोरबे धरणात ऑगस्टअखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नवी मुंबईत पाणी कपातीचा प्रस्ताव तयार करीत विभागानुसार सायंकाळी एक तास पाणी कपात करण्याचे नियोजन केले होते. मात्र 1 जुलैपासून शहरात व मोरबे धरण परिसरात पावसाचे आगमन झाले.

यानंतरही शहरात चांगला पाऊस होत होता, मात्र मोरबे धरण परिसरात तुरळक पाऊस होता. मात्र मागील आठ दिवसांत पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. आतापर्यंत 1707.20 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या वर्षी याच काळात 1258.5 मिमी पाऊस झाला होता. फक्त आठ दिवसांतच गेल्या वर्षीच्या पावसाची सरासरी ओलांडत सुमारे 50 मिमी. अधिक झाला आहे. त्यामुळे धरण पातळीत झपाट्याने वाढ होत धरण 60 टक्के भरले आहे. पुढील 192 दिवस म्हणजेच 22 जानेवारी 2023 पर्यंत शहराला पाणीपुरवठा करता येणार आहे. धरण शंभर टक्के भरण्यासाठी 2300 मिमी पावसाची आवश्यकता आहे. धरण भरण्यासाठी 4000 मिमी पावसाची आवश्यकता असते. गेल्या वर्षी 29 सप्टेंबर 2021 रोजी धरण भरून वाहू लागले होते.

पाऊस सुरू होण्यापूर्वी धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा होता; परंतु मागील आठवडाभरात पाणीसाठी 30 टक्केवरून 60 टक्के पार झाला आहे. त्यामुळे असाच पावसाचा जोर राहिला तर मोरबे यंदाही 100 टक्के भरेल.

-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply