संपूर्ण जगभर दहशत माजविणार्या कोरोना महामारीचा संसर्ग अखेर सहा महिन्यांनंतर भारतात कमी होताना दिसून येत आहे. त्या दृष्टीने ऑक्टोबर महिना देशासाठी दिलासादायक ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांचे हे फलित असल्याचे मानले जात आहे. अर्थात, धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे आरोग्याची काळजी घेताना कसूर नको!
कोरोना या तीन अक्षरी शब्दाने विश्वाची जीवनशैली पूर्णत: बदलून टाकली आहे. चीनमध्ये जन्माला आलेल्या कोविड-19 विषाणूने बघता बघता जगभर शिरकाव केला आणि होत्याचे नव्हते झाले. या संसर्गजन्य आजाराने भल्या भल्या देशांची भंबेरी उडाली. अनेक महासत्ता अक्षरश: हतबल झाल्याचे पहावयास मिळाले. इतर छोट्या-मोठ्या देशांचे हाल तर विचारायलाच नको. असंख्य जण कोरोनाची शिकार झाले. किड्या-मुंगीसारखी माणसे मेली. सर्वत्र हाहाकार उडाला. आपल्या देशातही कोरोनाने हातपाय पसरले. कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये देशाने दुसर्या क्रमांकापर्यंत मजलही मारली. सहा महिन्यांनंतर अन्य देश या महामारीशी अद्यापपर्यंत झुंजत असताना भारतात कोरोनामुक्त होणार्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. परिणामी रुग्णसंख्येत लक्षणीय घट होत आहे. विशेष म्हणजे जगाच्या पाठीवर एवढी मोठी लोकसंख्या असूनही भारताने या महामारीवर मिळविलेले नियंत्रण नक्कीच कौतुकास्पद म्हटले पाहिजे. त्याचे श्रेय जाते ते कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. दूरदृष्टी असलेल्या आपल्या पंतप्रधानांनी हा धोका वेळीच ओळखला होता. अमेरिकेसारखे देश रुग्णसंख्या वाढत असतानाही निर्बंध घालायला तयार नसताना पंतप्रधान मोदींनी मार्चपासूनच कडक लॉकडाऊन लागू केला. त्यामुळे नागरिकांची काही प्रमाणात त्रेधातिरपीट उडाली, पण अनेकांचा लाखमोलाचा जीव वाचला. जगभरात कोरोनामुळे लोक पटापट मरत असताना आपल्याकडे प्रचंड लोकसंख्या असूनही तुलनेत तितकी जीवित हानी झाली नाही. मोदी सरकारने मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर केला नसता तर देशभरात 25 लाख लोकांचे प्राण गेले असते. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत झाली, असे वैज्ञानिकांच्या समितीने म्हटले आहे. देशातील कोरोनाचे संकट फेबु्रवारी 2021मध्ये आटोक्यात येईल, असा दावाही सरकारने स्थापन केलेल्या या समितीने केला आहे. कोणत्याही आपत्तीत न डगमगता निणर्य घेणे महत्त्वाचे असते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी माहीर आहेत. देशावर कोणतेही संकट आले की ते न घाबरता त्यास स्वत: सामोरे जात असतात. म्हणूनच कोरोनाचा संसर्ग हळुहळू आपल्या देशातून कमी होऊ लागला आहे. एक वेळ अशी होती की एका दिवसातील रुग्णसंख्या एक लाखाचा टप्पा गाठण्याच्या उंबरठ्यावर होती आणि हाच आकडा निम्म्यावर आला आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या सहकार्यांना, सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना तसेच प्रशासनाला वेळोवेळी मार्गदर्शन करून, धीर देऊन या संकटावर मात करण्यासाठी बळ दिले. त्याचवेळी पॅकेज, योजना जाहीर करून जनतेला मोलाचा आधार दिला. त्याचे चांगले परिणाम आज दिसत आहेत. अर्थात, कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे बेफिकीर राहून चालणार नाही. या महामारीला देशातून पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे. नव्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकाचे ते कर्तव्य आहे. आपल्या निर्धार व एकजुटीपुढे ही आपदादेखील टिकू शकणार नाही.