खोपोली ः प्रतिनिधी
कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी खोपोलीत सर्वपक्षीय नेते व विविध संघटनांचे पदाधिकारी यांची नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन 31 मार्च व 1 एप्रिल असे दोन दिवस शहरात जनता कर्फ्यूचे आयोजन केले होते. त्यास खोपोलीकरांनी शंभर टक्के प्रतिसाद देत बंद यशस्वी केला.
संचारबंदीतही अनेक नागरिक क्षुल्लक कारणासाठी रस्त्यावर फिरत होते. त्यासाठी पोलिसांनी आक्रमकपणे त्यांना खाकी दणका दाखवत घरी जाण्याविषयी आवाहन करीत होते, पण नागरिक भाजी व किराणा खरेदीच्या बहाण्याने रस्त्यावर येऊन गर्दी करताना आढळत होते. अखेर सर्वपक्षीय नेत्यांनी नागरिकांना शिस्त लावण्यासाठी 31 मार्च व 1 एप्रिलला जनता कर्फ्यू लागू केला व तो यशस्वीही झाला. संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. औषध व दूध डेअरी वगळता सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. दरम्यान, खोपोलीत अनेक ठिकाणी हातावर पोट भरणार्या लोकांसाठी विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मदतीला धावून आले व त्यांनी मदतीचा हात दिला. यात पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचा मोठा वाटा आहे. विविध भागातील नगरसेवक व सामाजिक संस्थाही पुढे आल्या. सहजसेवा संघटनेने तर रस्त्यावर दिसणार्या अनाथ लोकांसाठी जागेवर जाऊन फूड पॅकेट्सचे वितरण केले.