Breaking News

जलपर्णी : उल्हास नदीची एक समस्या

कर्जतच्या कातळदरा भागात उगम पावलेल्या उल्हास नदीचा सुरुवातीचा प्रवास हा पावसाळ्यापुरता पाणी वाहून नेणारा असतो. पुढे टाटा धरणाच्या पाण्याचा प्रवाह पेज नदीतून उल्हास नदीत सामील होतो. उल्हास नदी तेथून बारमाही वाहणारी होते आणि पुढे त्या उल्हास नदीचे पाणी कल्याण खाडीला जाऊन मिळेपर्यंत बदलापूर येथे ते सर्व पाणी अडवून शहरी भागाला पिण्यासाठी दिले जाते. अशा या महत्त्वाच्या नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे, कारण कर्जत आणि नेरळ या शहरी भागाचे सांडपाणी या बारमाही वाहत्या नदीत वाहून येत असते. त्या सांडपाण्यामुळे उल्हास नदीच्या पाण्यात प्रदूषण झाले असून त्या प्रदूषित पाण्यामुळे जलपर्णी यांची वाढ झाली असून बारमाही वाहत्या असलेल्या उल्हास नदीसाठी पाणी प्रदूषित करणार्‍या जलपर्णी मोठी समस्या बनून राहिल्या आहेत.

उल्हस नदी ज्या ठिकाणी वाहती होते तेथपासून नदीचे पाणी गेल्या काही महिन्यापासून गढूळ बनले आहे. कर्जत येथून खर्‍या अर्थाने उल्हास नदीला सध्या जलपर्णीचा विळखा बसला आहे. तेथे मोठ्या प्रमाणात जलपर्णी उल्हास नदीत जमा झाली आहे. मागील  अनेकदा या जलपर्णी काढण्याचे काम कर्जत परिसरात हाती घेण्यात आले आहे. परंतु काढलेली जलपर्णी ही नदी पात्रातून काढून बाहेर न टाकता नदीपात्रातच टाकली जात असल्याने ही जलपर्णी नेरळ, शेलू, वांगणी परिसरात पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन नदीपत्रातील पाणी दूषित झाले आहे. कर्जत शहरात नागरी वस्तीतली सांडपाणी वाहून नेणारी गटारे ही उल्हास नदीमध्ये सोडली आहेत. पाणी प्रदूषित असले की प्रदूषित पाण्यामुळे जलपर्णी उगवतात, याचा प्रत्यय कर्जत-मुरबाड रस्त्यावर असलेल्या पुलावरून जाताना सर्वांना येत आहे. कारण गेल्या तीन महिन्यांपासून कर्जत शहराच्या सभोवताली उल्हास नदीमध्ये असलेले पाणी हिरवेगार बनले आहे. ते सर्व हिरवेगार जलपर्णी यांचे जंगल हे सांडपाण्यामुळे तयार झाले आहे. कर्जत शहरातून काही प्रमाणात सांडपाणी हे पुढे नदीतून खाली वाहून जात असते. त्या पाण्यात दररोज जलपर्णी वाहून पुढे आंबिवली येथून बारमाही वाहत्या बनलेल्या उल्हास नदीतून तरंगत जाताना दिसत आहे.

यापूर्वी या जलपर्णी या मे महिन्यातून उल्हास नदीच्या पाण्यातून वाहत जाताना अनेकदा दिसायचं, मात्र या वर्षी उल्हास नदीमध्ये जलपर्णी या जानेवारी महिन्यापासून पाण्यात वाहत जाताना दिसत आहेत. त्यामुळे नेरळपासून कल्याणपर्यंत सर्व  पिण्याचे पाणी वापरतात, त्यांच्या पोटात धस्स झाले आहे. कारण नदीचे पाणी केवळ गढूळ बनले नाही, तर त्या पाण्याला चिकटपणा देखील आला असून दुसरीकडे वाहत्या नदीमध्ये पोहण्याची मजा घेणारे यांच्या शरीरावर खाज सुटण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नदीमध्ये पोहायला जाणारे यांची संख्या कमी झाली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. मात्र ही समस्या केवळ कर्जत शहारत सांडपाणी उल्हास नदीमध्ये सोडल्यामुळे निर्माण झालेली नाही, तर गेल्या काही वर्षात सातत्याने नागरीकरण झालेल्या नेरळ शहरवजा गावातून असलेल्या रहिवासी भागातील सांडपाणी देखील माथेरानच्या डोंगरातून पावसाळ्यात पाणी वाहून नेणार्‍या नाल्यात सोडले आहे. तो नाला नंतर नेरळ येथे उल्हास नदीला जाऊन मिळतो. त्यामुळे कर्जत नंतर उल्हास नदीमध्ये नदीचे पाणी प्रदूषित करणारे जलपर्णी यांचे उगम हे नेरळ गावातून देखील झाले आहे. ते सांडपाणी येथे उल्हास नदीमध्ये गेल्यानंतर जलपर्णी यांच्या संख्येने वाढ होते. ही समस्या केवळ सांडपाण्यामुळे निर्माण झाली असल्याचे सगुणाबाग या कृषी पर्यटन केंद्राचे नदीचे पाणी मुंबई येथे परीक्षणासाठी पाठविल्यानंतर आलेल्या अहवालातून स्पष्ट दिसून येत आहे.

कृषिरत्न शेतकरी असलेले शेखर भडसावळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सावळाराम जाधव, कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ धुळे यांनी उल्हास नदीचे पाणी प्रदूषित होण्यास काय कारणीभूत आहे. याचा अभ्यास केला आहे, पण त्यातून सांडपाणी यावर जलपर्णी तयार होतात या निष्कर्षाप्रत सर्व आले आहेत, पण  आता ते सांडपाणी उल्हास नदीमध्ये सोडले जाणार नाही याची काळजी कोणी घेणार आहे की नाही? हा प्रश्न सतत भेडसावत आहे. कारण सांडपाणी निर्माण करीत असलेल्या जलपर्णी यांना रोखण्यासाठी प्रथम नदीमध्ये सोडले जणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्याच वेळी सांडपाणी उल्हास नदीच्या पाण्यात सोडले गेले तरी ते प्रक्रिया करून सोडले जावे याचे काटेकोर पालन केले जावे. त्याच वेळी उल्हास नदीच्या वाहत्या पाण्यात जलपर्णी वाहून जाणार नाही त्यांना रोखण्याचे काम देखील करावे लागेल.त्यासाठी उल्हास नदी ज्या ठिकाणी बारमाही पाण्याला जाऊन मिळते, त्या ठिकणी लोखंडी जाळी लावून पाणी अडवावे लागेल. या गोष्टी नेरळ येथे देखील  आहेत आणि तसे केले तर मग कदाचित उल्हास नदीचे पिण्याचे पाणी जे डोंबिवलीला जाते ते प्रदूषित होण्यावर काही प्रमाणात बंधने येतील.

या जलपर्णीमुळे जिल्ह्यातील जवळ जवळ सर्वच नद्यांमध्ये उन्हाळ्यात जलपर्णी वाढलेली दिसते. जलपर्णी असेल तर नदीचा प्रवाह खुंटतो. डासांचा प्रादूर्भाव वाढतो व लोकांना प्रदूषण झाल्याचे लक्षात येते. मग जलपर्णी काढण्यासाठी मोहीम राबवली जाते. अशीच मोहीम कर्जत परिसरात सुरू करण्यात आली आहे, परंतु काढून जलपर्णी ही नदीबाहेर न टाकता नदीच्या पाण्यात टाकली जात आहे. त्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले आहे. उल्हास नदीच्या पाण्यावर अनेक पाणी योजना अवलंबून आहेत, परंतु अनेक पाणी योजनांना फिल्टर प्लॅन्ट नसल्याने हे दूषित पाणी घराघरात जात असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

शहराच्या सांडपाण्यातून वा रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपणार्‍या पाण्यातील, सांडपाण्यामुळे जलपर्णी वाढते. ही पोषक द्रव्ये पाण्यात मिसळणे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत जलपर्णीची वाढ अनिर्बंधपणे होत राहते. याच पोषक द्रव्यांवर व इतर सेंद्रीय पदार्थांवर जीवाणूंची ही वाढ होत असते. अनेक रोगजंतू पाण्यात टिकून राहण्यात व त्यांची वाढ होण्यात या दूषित पदार्थांचा सहभाग असतो. त्यामुळे नदीपात्रात सांडपाणी सोडणेही तितकेच धोक्याचे आहे. कर्जत, नेरळ परिसरात तर अनेक बिल्डर, तसेच गावातील निघणारे सांडपाणी नदी पत्रात सोडले जाते, परंतु यावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने त्याचा त्रास अनेक गावातील नागरिकांना भोगावा लागत आहे. जोपर्यंत नदीपात्रात सांडपाणी नदीपात्रात सोडण्याचे कमी होत नाही तोपर्यंत जलपर्णी वाढण्याचे प्रमाण कमी होणार नाही.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply