Breaking News

काँग्रेसला घरघर

महाराष्ट्रात काँग्रेसला खरोखरच घरघर लागल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिसून येऊ लागले आहे. या निवडणुकीत काँग्रेसला हक्काच्या पुणे, सांगलीसारख्या मतदारसंघात तूल्यबळ उमेदवार मिळू नये यासारखी दुसरी शोकांतिका काय असू शकेल. असेच होत राहिल्यास महाराष्ट्रातून काँग्रेस हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही.

महाराष्ट्रात कधी काळी प्रस्थापित असलेल्या काँग्रेसला आता खर्‍या अर्थाने उतरती कळा लागल्याचे विदारक दृश्य सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिसून येऊ लागले आहे. हे असेच होत राहिल्यास महाराष्ट्र काँग्रेसमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. सारी हयात काँग्रेसमध्ये घालविलेली अनेक घराणी महाराष्ट्रात आहेत. अगदी आजोबा, पणजोबा यांच्यापासून नातवंडांपर्यंत सार्‍यांनीच काँग्रेसचे पाईक म्हणून काम केले आहे, पण आता मात्र याच काँग्रेसमधून बाहेर पडण्यासाठी सारे जण धडपडताना दिसत आहेत. सांगलीचेच उदाहरण घ्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांनी सारी हयात काँग्रेसमध्ये घालविली. दादा एक जबरदस्त व्यक्तित्त्व म्हणून सुपरिचित होते. राज्याच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान आजही सर्वश्रृत आहे, पण दादा गेले आणि सांगलीत काँग्रेसची वाताहात सुरू झाली. दादांच्या पश्चात विष्णूअण्णा पाटील, प्रकाशबापू पाटील, मदन पाटील, प्रतिक पाटील यांनी काँग्रेसचे नेतृत्व केले खरे, पण दादांसारखे प्रभावी नेतृत्व त्यांना निर्माण करता आले नाही. त्यातच सन 2014 मध्ये नरेंद्र मोदी लाटेत सांगलीत जोरदार परिवर्तन घडले आणि काँग्रेसचा सफाया उडाला आणि सांगलीत मनपा असो वा जिल्हा परिषद, पंचायत समित्या अथवा ग्रामपंचायती प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कमळेच फुलू लागल्याने काँग्रेसवाले धास्तावले. आता तर सांगलीत काँग्रेसला अधिकृत उमेदवारच देता आलेला नाही. ही मोठी शोकांतिका म्हटली पाहिजे. काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीने ही जागा चक्क स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडून देत एकप्रकारे सांगलीतून काँग्रेसचे विसर्जनच केले असेच खेदाने नमूद करावे लागेल. त्यामुळे दादांच्या वारसदारांना आपल्या राजकीय अस्तित्वासाठी चक्क स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आधार घ्यावा लागला. यासारखे दुसरे दुर्दैव आणखी काय असू शकेल. भविष्यात अशीच स्थिती राहिली, तर खरोखरच दादांच्या जन्म आणि कर्मभूमीतून काँग्रेसचे विसर्जन कृष्णेच्या पात्रात करण्यात आले असेच खेदाने म्हणावे लागेल. अर्थात काँग्रेसच्या अधःपतनास त्यांच्याच पक्षाची नेतेमंडळी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस देखील तितकीच कारणीभूत आहे. काँग्रेसचे खच्चीकरण करण्यात राष्ट्रवादीचा देखील मोठा सहभाग आहे. आता तर जिल्ह्यातील काँग्रेस नेते आपल्या राजकीय अस्तित्वासाठी भाजप, शिवसेनेचा आधार घेत आहेत. हे राजकीय परिवर्तन विकासासाठी होत असल्याने सामान्य कार्यकर्तेही आता युतीच्या प्रवाहात सहभागी होताना दिसत आहेत. जे 50 वर्षात घडले नाही ते आता पाच वर्षात घडतंय हे ज्ञात झाल्याने सर्वसामान्य मतदार देखील काँग्रेसपेक्षा शिवसेना, भाजपकडे विकासासाठी ठोस पर्याय म्हणून पाहत आहेत. आज सांगली मुक्त झाली उद्या आणखी कुठला तरी जिल्हा असाच काँग्रेसमुक्त होईल आणि एक दिवस अवघा महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होईल. यात शंका नाही.

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply