भारतीय ग्राहकशक्तीच्या ताकदीवर देशात पैसा फिरायला लागला आणि वातावरण बदलून गेले. भारतातील पैसा असाच फिरत राहिला आणि त्याचा लाभ स्थानिक पातळीवर मिळू लागला तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा हा उत्साह दीर्घकाळ टिकेल आणि वर्तमानातील आर्थिक संकटाच्या झळीची तीव्रता निश्चितच कमी होईल.
अर्थचक्रासंबंधी सर्व आकडेवारी असे सांगू लागली आहे की भारत नावाचा हत्ती उठून चालायला लागला आहे. वस्तू आणि सेवांच्या खरेदी-विक्रीतूनच ज्याची निर्मिती होते, असा जीएसटी कर एक लाख कोटी रुपयांवर पोहचला आहे. जीडीपीमध्ये सर्वाधिक वाटा असलेले सेवा क्षेत्राने वेग पकडला आहे. सर्व प्रकारच्या उत्पादन प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. मोटारींचा खप पुन्हा वाढला आहे. सार्वजनिक वाहतूक बराच काळ बंद राहिल्याने एरवी जे दुचाकी वापरत नव्हते, त्यांनी दुचाकी खरेदी सुरू केल्याने दुचाकींचा खपही पूर्वीपेक्षा वाढला आहे. ई-कॉमर्स कंपन्यांच्या साईटवरील मोबाइल फोन विक्रीचे आकडे लाखात जात आहेत. या कंपन्यांनी लावलेले सेल जोरात चालले आहेत. हे सर्व शक्य होते आहे, ते भारतीय ग्राहकशक्तीमुळे. गावातल्या जत्रा आणि सणवार पूर्वी जसे गावाच्या अर्थचक्राला फिरवण्यासाठी उपयोगी ठरत होते, त्याच धर्तीवर दसरा-दिवाळीच आपल्या मदतीला आली आहे. या सणांचा भारतीय नागरिकांवर जो प्रभाव आहे, तो आता काम करू लागला आहे.
दसरा, दिवाळी आली मदतीला
जगाची सर्व अर्थव्यवस्था परस्परांशी जोडली गेली असल्याने जगात घडणार्या घडामोडींचा परिणाम आपल्यावर होणे, हे अपरिहार्यच आहे, पण अर्थचक्र गती घेण्यासाठी सर्वात मोठा वाटा भारतीय ग्राहकशक्तीचाच आहे, हे भारतीय हत्तीने सिद्धच केले आहे. कोरोनाच्या सर्वाधिक प्रादुर्भावाने अर्थसत्ता मानली गेलेली अमेरिका किती प्रभावित झाली आहे, हे कळण्यास तेथील निवडणुकीच्या गदारोळात मार्ग नाही. ज्या चीनमधून कोरोनाचा प्रवास सुरू झाला, त्या चीनमधील पोलादी पडदा तेथे काय चालले आहे, हे कळू देत नाही. थंडीच्या सुरुवातीमुळे युरोपात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. भारताच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी, जगात ज्यांची दखल घ्यावी, असे हे प्रांत. पण कोरोनामुळे जागतिक बाजाराला धक्का बसल्याने पुन्हा एकदा भारतीय ग्राहकच महत्वाचा ठरतो आहे. दसरा, दिवाळीच्या खरेदी-विक्रीमुळे बाजारात होत असलेली हालचाल भारताच्या पथ्यावर पडली आहे. भारत या अभूतपूर्व संकटातून कसा मार्ग काढणार, असे अनेक प्रश्न अगदी एक दोन महिन्यांपूर्वी चर्चिले जात होते. त्याचे उत्तर योगायोगाने भारतीय ग्राहकशक्तीने देऊन टाकले आहे.
सर्वव्यापी नसले तरी महत्त्वाचे
भारताच्या अनेक समस्या संसाधने कमी आहेत, पैसा कमी आहे, मनुष्यबळ कमी आहे, या नसून पैसा फिरत नाही, हीच खरी समस्या आहे, असे अनेकदा सिद्ध होते आहे. दसरा, दिवाळीत होत असलेली खरेदी हे त्याचे चांगले उदाहरण म्हणता येईल. कोरोनाने भारतीयांना किमान सहा महिने घरात बसायला लावले. घरात बसून माणसे कंटाळली तर आहेतच, पण नवे काही घेण्याचा आणि वापरण्याचा आनंदच या काळात हिरावला गेल्याने संधी मिळताच ती बाहेर पडली असून खरेदी करू लागली आहेत. कोरोनामुळे अनेक उद्योग व्यवसायांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारातील उत्साह हा सर्वव्यापी नसला तरी तो अशाच मार्गाने पुढे जाणार, याच मार्गाने ही कोंडी फुटणार, हेही तेवढेच खरे आहे. सर्व चाके एकाच वेळी गती पकडणार नाहीत, हे सर्वांनाच कळून चुकले असल्याने जी चाके फिरू लागली आहे, त्यात संधी शोधणे, हे क्रमप्राप्त झाले आहे.
सर्वाधिक वर्किंग लोकसंख्या
भारतीय ग्राहकाला एवढे महत्व आहे, हे मान्य करावेच लागते कारण त्याची प्रचंड संख्या आणि 135 कोटी नागरिकांची वयानुसार असलेली विभागणी. पंधरा कोटी ज्येष्ठ नागरिक, त्याच्या दुप्पट म्हणजे 30 कोटी छोटी मुले, असे 45 कोटी मोठे ग्राहक नाहीत म्हणून घडीभर बाजूला ठेवले तरी 90 कोटी नागरिक या ना मार्गाने वर्किंग आहेत. म्हणजे ते काही कमावत आहेत. एवढी वर्किंग किंवा क्रियाशील असलेली लोकसंख्या जगाच्या पाठीवर आज फक्त भारतात आहे. याचाच अर्थ सर्वाधिक ग्राहक भारतात आहेत. अर्थात, विकसित देशांत दरडोई जेवढी क्रयशक्ती आहे, तिची तुलना करता भारतीय ग्राहकांची क्रयशक्ती खूपच कमी आहे. पण गरजांच्या निकषांचा विचार करावयाचा तर भारतीय क्रयशक्ती जीवनावश्यक गोष्टींवर अधिक खर्च होत असल्याने ती सातत्यपूर्ण आणि खात्रीची आहे. भारत एकाच निकषांत कमी पडतो, ते म्हणजे पैसा फिरत नाही. त्यामुळे 90 कोटी वर्किंग लोकसंख्येच्या ग्राहकशक्तीचा जो अविष्कार अर्थव्यवस्थेत दिसायला हवा, तो दिसत नाही.
भारतीय क्रयशक्तीची ताकद
कोरोनासारख्या आर्थिक संकटानंतर दर महिन्याला लाखावर चारचाकी गाड्या खपतात, दुचाकी तर त्याहीपेक्षा जास्त विकल्या जातात, एक वेगळी चार चाकी गाडी बाजारात येते आणि तिची एका दमात 50 हजार बुकिंग होते, ई-कॉमर्स कंपन्यांच्या सेलमध्ये मोबाइल फोन हातोहात खपतात, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशिनसारख्या उपकरणांना चांगली मागणी येते, एवढेच नव्हे तर नवी घरे घेणार्या नागरिकांमुळे रियल इस्टेट बाजारही हलू लागतो. अशी एक एक क्षेत्र चालायला लागतात. याचाच अर्थ पैसा फिरायला लागतो. तो फिरला की अर्थचक्राची काळजी करण्याची गरज पडत नाही. भारतीय शेअर बाजार त्याचे काही प्रमाणात प्रतिबिंब आहे, असे मानले तर तो का वर जातो आहे, याचाही उलगडा होतो. या सर्व गोष्टींच्या मुळाशी भारतीय ग्राहकशक्ती आहे, हे एकदा लक्षात आले की पैसा सर्वांच्या हातात का गेला पाहिजे, हे वेगळे सांगण्याची गरज पडत नाही.
दर्जा महत्त्वाचा की सुव्यवस्था?
आता या अर्थचक्रात नवा बदल काय झाला आहे, तोही समजून घेतला पाहिजे. तो बदल असा आहे की ई-कॉमर्स कंपन्या आणि इतर मोठ्या कंपन्यांच्या तिजोरीत जो पैसा जमा होतो आहे, त्याचा लाभ आपण राहतो त्या गावाला किंवा शहराला किंवा अगदी देशाला होतोच, असे काही खात्रीने सांगता येत नाही. उलट, या व्यवहारातील मोठा वाटा गाव, शहर किंवा देशाबाहेर जातो आहे. या नव्या संकटाचा सामना कसा करावयाचा? स्थानिक वस्तू खरेदी करावयाची तर तिचा दर्जा बाहेरून येणार्या वस्तूशी जुळत नाही. स्थानिक सेवा घ्यायची तर तीही मोठ्या कंपन्यांच्या सेवेशी स्पर्धा करू शकत नाही. शिवाय, जे अधिक लांबचे, जे चकचकीत ते चांगले, अशी आपली मानसिकता झाली आहे, तिचे काय करावयाचे, हा मोठाच पेच आहे. तो सोडविण्यासाठी भारतीय ग्राहकाने आर्थिकदृष्ट्या अधिक जागरूक होणे, क्रमप्राप्त आहे. कारण आपल्या आजूबाजूचे अर्थचक्र फिरले नाहीतर त्याचे जे परिणाम होतात, ते आपले समाजजीवन असुरक्षित करणारे असतात. पैसा हाती नाही आणि त्यामुळे चांगले जगू शकत नाही, अशा नागरिकांची संख्या जेव्हा आजूबाजूला वाढू लागते, तेव्हा कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. अशावेळी वस्तू आणि सेवांच्या दर्जापेक्षा समाजजीवन सुरक्षित असण्याला जास्त महत्व प्राप्त होते.
आनंदाच्या कवेत घेण्याचा मार्ग
सुदैवाचा भाग असा की जनधनच्या रूपाने बँकिंगचा होणारा प्रसार आणि आर्थिक सहभागीत्व वाढते आहे. आधार कार्डच्या रूपाने खर्या गरजूंपर्यंत पोहचणे शक्य होते आहे. आधार, बँक आणि मोबाइल फोनच्या जोडणीने पैसा पोहचविणे आणि व्यवहार करणे सोपे होते आहे. नव्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक लाभ सर्वांकडून घेतला जातो आहे. त्यामुळेच डिजिटल व्यवहारांमध्ये आता नवनवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. एकाच ठिकाणी पैसा थांबला की तो केवळ स्वतः सडत नाही, तो बाजार आणि व्यवस्थेलाही सडवत असतो. तो पैसा फिरण्यास गती मिळाली तर काय होऊ शकते, याची चुणूक या दसरा, दिवाळीत पाहायला मिळते आहे. पैसा फिरण्याची ही प्रक्रिया देशात अशीच चालू ठेवूनच सर्वांना आनंदाच्या कवेत घेणे शक्य होणार आहे.
-यमाजी मालकर , ymalkar@gmail.com