Breaking News

शेअर खरेदी आणि कमी जोखीम? शक्य आहे!

शेअर बाजारात थेट गुंतवणूक म्हणजे जोखीम असं समीकरण आपण उगाचच उराशी बाळगतो आणि आपसूकच मग म्युच्युअल फंडांकडं वळतो. परंतु थेट शेअर खरेदीपेक्षा तुलनेनं कमी जोखमीच्या काही गोष्टी उपलब्ध आहेत. त्यातली एक म्हणजे स्टॉक एक्स्चेंजच्या (ईटीएफ) निर्देशांकात गुंतवणूक.

आठवड्याच्या शेवटास दिवाळी आहे आणि त्या निमित्तानं म्हणजे नवीन संवत वर्षासाठी शनिवारी लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं अनेक लोक गुंतवणुकीस मुहूर्त म्हणून शेअर्स खरेदी करतात. जरी ही एक प्रथा असली तरी खरा मुहूर्त साधणं म्हणजे योग्य भावात चांगल्या कंपनीच्या शेअर्सची खरेदी करणं आणि होय, सर्वात महत्वाचं म्हणजे झुंडीबरोबर वाहवत न जाणं आणि कोणाच्या तरी टिप्सवर भरंवसा ठेऊन शेअर खरेदी न करणं. बचत आणि गुंतवणूक यात लक्षणीय फरक आहे. बचत म्हणजे वाचवून ठेवलेले पैसे जमा करून ठेवणं आणि जेव्हा लागतील तेव्हा ते वापरणं. तर गुंतवणूक म्हणजे त्या साठवलेल्या पैशाची वृद्धी व्हावी व आपले भविष्यातील इप्सित साध्य करण्यास त्या वाढलेल्या पैशानी हातभार लावावा ही आशा ठेवणं. परंतु गुंतवणूक जर योग्य अभ्यासाधारे केली तरच तिच्यावर अवलंबून राहता येऊ शकतं आणि ’अशी’ गुंतवणूक न गमावणं हेच खरं गमक आहे आणि यालाच सध्या जास्त महत्त्व आलंय. बचत म्हणजे अशा ठिकाणी केली जाते जिथं नुकसान होण्याची शक्यता फारच कमी असते आणि याउलट अनेक वेळा म्हटलं जातं की जी रक्कम आपण घालवू शकतो तीच रक्कम गुंतवणूक म्हणून करावी, अर्थातच याची अनेक कारणं देखील आहेत.

दिवाळीसाठी अनेक ब्रोकर्स, न्यूज चॅनेल्स, अर्थपुरवण्या यांमधून अनेक तज्ज्ञांनी अनेक कंपन्या सुचवून झाल्या असतील. मागील दोन महिन्यांतील माझ्या लेखमालेत मी देखील काही मिडकॅप व स्मॉल कॅप कंपन्या सुचवून झाल्या आहेत. परंतु कंपन्यांच्या नावांकडं जाण्याआधी नव्यानं आलेल्या गुंतवणूकदारांसाठी जरा हटके गोष्ट मला येथे सुचवायचीय..

एकंदरीत शेअर बाजारात थेट गुंतवणूक म्हणजे जोखीम असं समीकरण आपण उगाचच उराशी बाळगतो आणि आपसूकच मग म्युच्युअल फंडांकडं वळतो. परंतु थेट शेअर खरेदीपेक्षा तुलनेनं कमी जोखमीच्या गोष्टी आज येथे मांडत आहे.

आता कंपन्यांच्या शेअर्समध्ये थेट गुंतवणूक करणं म्हणजे त्या कंपन्यांबद्दल माहिती काढणं, कंपन्यांच्या आर्थिक गोष्टी म्हणजे प्रॉफिट अ‍ॅण्ड लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट अर्थातच ताळेबंद, कॅश फ्लो स्टेटमेंट, कंपनीचे प्रवर्तक/मालक यांचा कंपनीमध्ये मालकी हिस्सा किती आहे? कंपनीचे शेअर्स कोठे गहाण आहेत का? कंपनी व्यवस्थापन उत्तमरीत्या कंपनीचं कामकाज, व्यवसाय हाताळत आहेत की नाही? अशा अनेक बाबी तपासाव्या लागतात आणि अशा शेअर बाजारात चार हजारांहून जास्त व्यवहार होत असलेल्या कंपन्या आहेत. त्यामुळं अशा सर्व कंपन्यांचा अभ्यास करणं कठीण व वेळ लावणारी गोष्ट आहे. त्यापेक्षा जर आशियामधील सर्वांत जुन्या असलेल्या स्टॉक एक्स्चेंजच्या निर्देशांकात म्हणजे एस अ‍ॅण्ड पी बीएसई सेन्सेक्समध्येच जर गुंतवणूक केली तर? 

1979 पासून सेन्सेक्स 100 अंशावरून आज 42000 च्या जवळ पोहचलाय, म्हणजेच 41 वर्षांत 420 पट. बीएसई सेन्सेक्समध्ये विविध प्रमुख क्षेत्रामधील मोठ्या, सुस्थापित आणि आर्थिकदृष्ट्या उत्तम कंपन्यांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या 30 कंपन्या आहेत. अर्थातच अनेक कसोट्या पार करूनच अगदी निवडक अशा देशातील सर्वोत्तम अशा 30 कंपन्यांनाच सेन्सेक्समध्ये स्थान मिळतं आणि सेन्सेक्समध्येच जर आपण गुंतवणूक केल्यास तुलनेनं आपली जोखीमही रंग उत्पादन, बँका, ऑटोमोबाइल, आर्थिक, टेलिकॉम, टेक्नॉलॉजी, ग्राहकाभिमुखी, ऊर्जा, तेल उद्योग, स्टील, औषधनिर्माण, रिटेल, सिमेंट इ. क्षेत्रांतील 30 कंपन्यांमधून आपोआपच विभागली जाते. याउलट एखाद्या कंपनीचा शेअर जर आपण खरेदी केल्यास त्या कंपनीतच जर काही विपरीत घडामोडी घडल्या अथवा एखादी वाईट बातमी आल्यास त्या कंपनीच्या शेअरभावानं गटांगळ्या न खाल्ल्या तरच नवल. या उलट सेन्सेक्समध्ये 30 कंपन्यांचा पोर्टफोलिओ असल्यानं त्यातील एखाद-दुसर्‍या कंपनीच्या शेअरभावात घसरण झाल्यास एकूण सेन्सेक्सवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. आणि हीच गोष्ट उजवी ठरते. आता सेन्सेक्समध्ये गुंतवणूक कशी करायची? तर, ’एसबीआयसेन्सेक्स’ ज्याच्या एका शेअरचा भाव 447 रुपये आहे आणि याच्या भावातील हालचाल ही अगदी सेन्सेक्सच्या बरोबरीनं, काकणभर उजवीच असते. अगदी त्याचप्रमाणं निफ्टीच्या 50 शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी निफ्टीबीज, शुद्ध सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी गोल्डबीज असे अनेक ईटीएफ बाजारात उपलब्ध आहेत. अशा विविध निवडक ईटीएफची यादी आणि त्यामधील गुंतवणूक कोणत्या अनुषंगानं होऊ शकते हे खालील तक्त्यात मांडत आहे.

यामधील निफ्टीबीज, गोल्डबीज व एसबीआय सेन्सेक्स याबद्दल उल्लेख केलेलाच आहे. याव्यतिरिक्त ज्युनिअरबीजद्वारे निफ्टी50 नेक्स्ट या निर्देशांकामधील 50 तर M100 याद्वारे निफ्टी मिडकॅप निर्देशांकातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. याव्यतिरिक्त, निवडक बँकिंग शेअर्समध्ये गुंतवणुकीसाठी बँकबीज, सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी पीएसयूबँकबीजचे पर्याय देखील उपलब्ध आहेत. अगदी अमेरिकेतील नॅसडॅक एक्स्चेंजवर नोंदणीकृत असलेल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये N100 द्वारे देखील गुंतवणूक करता येते. EBETF0430  म्हणजे याद्वारे AAA मानांकन असलेल्या सरकारी बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करता येते ज्याची मुदत एप्रिल 2030 पर्यंत आहे. या भारत बॉण्ड ईटीएफ प्रकारात मुदतीचे वेगवेगळे पर्याय देखील आहेत, अर्थातच जितकी मुदत जास्त तितका परतावा अधिक. बचत खात्याप्रमाणं परतावा देणारा ईटीएफ म्हणजे लिक्विडबीज आणि सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एलआयसी एनईटीएफ जीएससी हा देखील ईटीएफ शेअरबाजारात उपलब्ध आहे.

त्यामुळं आता एकाच जागी तुमच्या डीमॅट खात्यामधूनच शेअर बाजार, डेब्ट, सोनं, सरकारी रोखे, बॉण्ड्स या सर्व मालमत्ता प्रकारात गुंतवणूक करता येऊन आपण देखील स्वतःपुरते तरी फंड मॅनेजर नक्कीच बनू शकतो. ईटीएफमध्ये एसआयपीसुद्धा करता येते.

आज मी या लेखात काही कंपन्यांची नावं माझ्या दृष्टीनं सुचवत आहे, अर्थातच जरी शेअर बाजाराचे निर्देशांक आपल्या उच्चांकाजवळ पोहचले असतील तरी बाजार पडतो तेव्हा टप्प्याटप्प्याने अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते.

रिलायन्स, एशियन पेंट्स, डीमार्ट, जुबिलंट फूड्स, इन्फो एज, आयटीसी, एसबीआय लाईफ, आयसीआयसीआय बँक, डिव्हिज लॅब, इन्फोसिस.

सुपर शेअर : इंडसइंड बँक

गेल्या आठवड्यातच कोटक महिंद्रा बँक ही इंडसइंड बँकेचं अधिग्रहण करणार अशी बातमी असल्यानं सर्वांचंच लक्ष हिंदुजा समूहाचा हिस्सा असणार्‍या इंडसइंड बँकेकडं होतं. मागील आठवड्यात या बँकेनं आपले दुसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर केले. ज्यामध्ये निव्वळ व्याजाचं उत्पन्न मागील वर्षातील दुसर्‍या म्हणजेच सप्टेंबर तिमाहीतील उत्पन्नापेक्षा  12.66 टक्क्यांनी वाढून 3278 कोटी रुपयांवर पोहचलंय तर ऑपरेटिंग प्रॉफिट हा 8.87 टक्क्यांनी वाढून 2830 कोटी रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळं अशा दुहेरी गोष्टींमुळं आणि एकूणच बँकांच्या शेअर्समध्ये आलेल्या तेजीमुळं हा शेअर एकाच आठवड्यात 26 टक्के वाढ नोंदवून मागील आठवड्याचा सुपर शेअर ठरला.

-प्रसाद ल. भावे (9822075888) , sharpfinvest@gmail.com

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply