Breaking News

माणगाव तालुक्यात हळदीची लागवड; अर्धा एकरात दहा टनाचे उद्दिष्ट

माणगाव : प्रतिनिधी

लहरी पर्जन्यमानामुळे भातशेती धोक्यात आली असतानाच माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील शेतकरी राजेंद्र कोळवणकर यांनी मुंबई-गोवा महामार्गालगत केलेली जैविक हळदीची यशस्वी लागवड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. माणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेतीचे उत्पादन घेतले जाते, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये लहरी पावसामुळे भातशेती संकटात सापडत आहे. कापणीच्या हंगामात पाऊस लांबत असल्यामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. भातशेती तोट्यात जात असल्यामुळे शेतीचे क्षेत्रही कमी होत आहे. यामुळे माणगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करत असून, तालुक्यातील इंदापूर येथे राजेंद्र कोळवणकर यांनी पहिल्यांदाच मल्चिंगद्वारे जैविक हळदीची लागवड केली आहे. राजेंद्र कोळवणकर यांनी मुंबई-गोवा महामार्ग लगत असलेल्या अर्धा एकर क्षेत्रावर हळदीची लागवड केली आहे. सुमारे 150 किलो हळदीचे वाण त्यांना लागले. मल्चिंगमुळे तण काढण्याच्या खर्चात कपात झाली आहे. नऊ महिन्यांत हे पीक बहरास आले असून, डिसेंबरअखेर त्याची काढणी केली जाणार आहे. अर्ध्या एकर क्षेत्रातून दहा टन हळद काढण्याचे कोळवणकर यांचे लक्ष्य असून अतिशय जोमाने वाढलेले हळदीचे पीक उत्तम असल्याचा निर्वाळा दापोली कृषी विद्यापीठासह रोहा किल्ला येथील शेतकी शाळेतील कृषी अधिकार्‍यांनीही दिला आहे.

अर्ध्या एकर क्षेत्रातून किमान दहा टन हळदीचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट आहे. जैविक पद्धतीने ही हळद लागवड केली आहे. हळदीच्या लागवडीतून चांगल्या प्रकारचे उत्पादन घेता येऊ शकते ही बाब आम्ही सर्वांसमोर आणली आहे.

-राजेश कोळवणकर, शेतकरी, इंदापूर, माणगाव

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply