पनवेल : रामप्रहर वृत्त
दिवाळी आनंददायी व अनन्यसाधारण सण आहे. या सणाच्या अनुषंगाने फराळाप्रमाणे विविध साहित्य असलेल्या दिवाळी अंकांची निर्मिती केली जाते. दिवाळी अंकांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपली आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 13) येथे केले.
प्रमोद वालेकर संपादित दै. किल्ले रायगड, अनिल भोळे संपादित सा. रसायनी टाईम्स आणि संजय कदम संपादित सा. रायगड मनोगत या दिवाळी विशेषांकांचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या प्रकाशन समारंभास पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद वालेकर, रमेश भोळे, प्रदीप वालेकर, दीपक घोसाळकर, संजय कदम, अनिल भोळे, केवल महाडिक, उमेश भोईर, संदीप भाकरे, ओमकार महाडिक आदी उपस्थित होते.
किल्ले रायगडचा दिवाळी अंक हा त्यांच्या आजवरच्या मेहनती पत्रकारितासृष्टीतील मानाचे पान ठरला आहे. रसायनी टाईम्स दिवाळी विशेषांकात विविध लेखांसोबत साईबाबा यांच्यावर आधारित लेख प्रामुख्याने प्रसिद्ध करण्यात आला आहे. साईबाबांच्या आशीर्वादाने भक्तांना नेहमी ऊर्जा मिळते असे सांगून महाराष्ट्र खुला झाला, पण मंदिरे अद्याप खुली झाली नाहीत. लवकरात लवकर भक्तीचे दारे उघडी व्हावीत, अशी अपेक्षा आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करून दिवाळी अंक निर्मितीला प्रोत्साहन दिले जाते. या स्पर्धेच्या अनुषंगाने विविध साहित्य असलेले अंक वाचायला मिळतात असे नमूद करून संस्कृती जपणारे साहित्य नेहमी मौल्यवान ठरले आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
शंभर वर्षांतून महामारी आली आहे. याची कुणीही अपेक्षा केली नव्हती आणि या कोरोना संक्रमणातून कोणतेच क्षेत्र सुटले नाही. त्याचा सर्वांना अनपेक्षित फटका बसला आहे. ते पाहता आगामी काळातही सगळ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करून आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
लेखन आणि वाचनातून वैचारिक समृद्धी वृद्धिंगत होते. दिवाळी अंक म्हणजेच विविध संस्कृती, कला, परंपरा जपणारे प्रमुख माध्यम आहे. सोशल मीडियाचा प्रसार वाढला असला तरी भाषा आणि मराठी साहित्य समृद्ध करण्याच्या प्रेमापोटी दिवाळी अंक प्रसिद्ध केले जात असून, ही मेहनत निश्चितच कौतुकास्पद आहे.
-परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल महानगरपालिका