कर्जत : बातमीदार
मुक्या प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बेकरेवाडीमधील आदिवासी ग्रामस्थांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला आहे, त्यात साचून राहिलेल्या पाण्यामुळे ग्रामस्थ आनंदले आहेत.
कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगर रांगेत बेकरेवाडी ही आदिवासीवाडी असून, वन विभागाच्या दळी भूखंडावर वसलेल्या या आदिवासी वाडीमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते आणि त्याचा फटका माणसापासून जनावरे आणि वन्य प्राण्यांनादेखील बसतो. मुक्या प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बेकरेवाडीमधील आदिवासी ग्रामस्थांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी वाडीतील 25 ते 30 ग्रामस्थांनी एकत्र येऊन सिमेंट पिशव्यांमध्ये माती भरून बंधारा बांधण्याचे काम केले. त्यात दिवसभर श्रमदान केल्यानंतर मोठा वनराई बंधारा बांधून पूर्ण झाला आहे. त्या बंधार्यात साचून राहिलेल्या पाण्यामुळे मुक्या प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.