नेरुळ ः वार्ताहर
आज सर्वच क्षेत्रात महिलाही आपली भूमिका प्रभावीपणे पार पाडीत असून यास साहित्य क्षेत्रही अपवाद नाही, परंतु त्यांची ही गुणवत्ता प्रभावीपणे पुढे येताना दिसत नसल्याची खंत पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी वाशी येथे व्यक्त केली. योगसाधिका शकुंतला निंबाळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त योग विद्या निकेतन वाशी येथे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नवी मुंबई शाखेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या गुणवंतांच्या गुणगौरव समारंभाचे आयोजन रविवारी (दि. 20) करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर कोमसापच्या अध्यक्षा नमिता कीर, गझलकार इक्बाल कवारे, अॅड. पी. सी. पाटील, रमेश कीर, कोमसाप नवीन मुंबई शाखाध्यक्ष मोहन भोईर आदी उपस्थित होते. कार्यक्रमात जयश्री पाटील, दमयंती भोईर, सुवर्णा पाटील, डॉ. राजेश्री, नीता माळी, रुपाली निंबाळकर, ज्योती पाटील, धनश्री रानकर, मीनाक्षी तांडेल, रुपाली बोरुडे, स्मिता वाजेकर, नुरी कवारे, स्नेहाराणी गायकवाड यांना योगसाधिका शकुंतला निंबाळकर महिला गुणगौरव पुरस्कार तर सुप्रसिद्ध तबलापटू गुरुनाथ पाटील, साहित्यिक मुकुंद महाले, प्रा. चंद्रकांत पाटील, दयानंद हेगडे, विजय गव्हाळे यांना कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनी पुरस्कारप्राप्त सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कोकण मराठी साहित्य परिषद ही समाज भान असलेली संस्था आहे. म्हणूनच समाजातील यशवंतांच्या, गुणवंतांच्या कार्याची ती सातत्याने दखल घेत असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक, साहित्यिक मोहन भोईर यांनी सांगितले. तर या पुरस्काराने मी केलेल्या कार्याची पोचपावती मिळून यामुळे माझी जबाबदारी वाढल्याची भावना गौरवमूर्ती गुरुनाथ पाटील यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांनीही महिलांनी आपले कलागुण समजून त्यांची प्रगती साधणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.शिवजयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अमृत पाटील नेरुळकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील शिववंदना या गीताने रंग भरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिका दमयंती भोईर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोमसापच्या सदस्यांनी मेहनत घेतली.