कलाकारांच्या बहारदार सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध
पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोनाचे संक्रमण पाहता अनेक सण साजरे करताना आनंदाला कात्री लावावी लागली. या सर्व सणांत दीपावली विविध फराळ, फटाक्यांची आतषबाजी, रांगोळी, किल्ले बांधणी, शुभेच्छा आदींचा आगळावेगळा व उत्साहाचा सण आहे. या सणानिमित्त उल्हासमय वातावरण असते. दरवर्षी दिवाळी पहाट म्हणजे मैदाने हाऊसफुल्ल करणारी असायची, पण यंदा कोरोनामुळे यावर बंधने आली असली तरी पनवेल तालुका सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष उमेश चौधरी यांच्या पुढाकाराने शनिवारी (दि. 14) पनवेल तालुका सांस्कृतिक सेल व नादब्रह्म साधना मंडळ खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या ऑनलाइन दिवाळी पहाट 2020 या संगीतमय कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दीपावली म्हटली की दिव्यांचा, आनंदाचा आणि संस्कृतीचा सण. या सणानिमित्त लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वत्र आनंद आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते. त्यात सुरांच्या आविष्कारांनाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. उमेश चौधरी गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. यंदा दिवाळी पहाटचे हे 10वे वर्ष होते. ऑनलाइन फेसबुक, मल्हार टीव्ही व यू ट्यूबवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होते.
या सांस्कृतिक सोहळ्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध कीर्तनकार हभप जयेश महाराज यांनी दिवाळीचे महत्त्व सांगताना आजच्या परिस्थितीच्या विषयाची सत्यता सांगितली. कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद अझीम खान यांच्या सतार वादनाने झाली.
त्यांनी सुरुवातीला राग खटतोडी या अनवट रागाने सुरुवात करून भावी पिढीला हे अनवट राग लुप्त होण्यापासून वाचवू या, असा संदेश दिला. त्यानंतर कार्यक्रमाची सूत्रे सुप्रसिद्ध गायक रायगडभूषण पंडित उमेश चौधरी यांनी आपल्या हाती घेत मनुवा तु जागत रहियो ही अहीरभैरव रागातील प्रसिद्ध बंदिश सादर केली. त्यानंतर श्रोत्यांनी केलेल्या फर्मायशीनुसार तेजोनिधी लोहगोल, सो हम हर डमरू ही नाट्यगीते सादर केली. शेवटी उभा चंद्रभागे तिरी हा अभंग घेऊन श्रोत्यांची मने जिंकली.
नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची सांगता भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी यांच्या गायनाने झाली. विशेष म्हणजे त्यांनी केदार राग सकाळी गाता यावा म्हणून प्रभात केदार हा एक नवीन राग तयार करून दिवाळीच्या दिवशी श्रोत्यांना अनमोल भेट दिली. एकूण सोनेरी पहाट आणि सुरांची सुरेल बरसात होत या ऑनलाइन दिवाळी पहाटने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्यावर निषाद पवार, हार्मोनियम ओमकार दातार, तर पखवाजवर ज्ञानेश्वर खैरे यांची साथ लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हभप जयेश महाराज यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश चौधरी व अक्षय चौधरी यांनी विशेष मेहनत घेतली.