नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लहान मुलांची खेळणी तयार करणारी अमेरिकन कंपनी मेटेलने 60वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. यानिमित्त कंपनीने जगातील 19 यशस्वी महिलांची बार्बी डॉल तयार केली आहे. यात भारताची जिमनॅस्ट दीपा करमारकरचा समावेश आहे.
दीपा करमारकर ही भारताकडून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी पहिली जिमनॅस्ट होती. तिला केवळ एका गुणामुळे कांस्यपदकापासून दूर रहावे लागले.
दीपासह अमेरिकन अभिनेत्री व मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणार्या यारा शाहिदीचीसुद्धा बार्बी डॉल तयार करण्यात आली आहे. याशिवाय टेनिस स्टार आणि महिलांच्या क्रमवारीत एक नंबरला असलेल्या जपानच्या नाओमी ओसाकाचाही या महिलांमध्ये समावेश आहे. सुप्रसिद्ध इटालियन शेफ रोझाना मार्झिएल हिचीदेखील बार्बी डॉल तयार करण्यात आली आहे. तिला ‘क्वीन ऑफ मोझ्झारेल्ला’ असेही म्हटले जाते.