खोपोलीत महायुतीचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात

खालापूर : प्रतिनिधी
कर्जत, खालापूर विधानसभा मतदारसंघात मागील 15 वर्षे शिवसेना-भाजप युतीचा आमदार नाही. त्यामुळे येथील विकासकामे रखडली आहेत. कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी येथे महायुतीचा आमदार होणे गरजेचे आहे. येथील विरोधकांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घ्यावी आणि एकजुटीने काम करून महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना विजयी करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाई शिंदे यांनी नुकतेच खोपोलीत केले. खालापूर तालुक्यातील शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच खोपोलीतील संगम रिसॉर्ट येथे घेण्यात आला. त्यात भाई शिंदे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. शिवसेनेेने ज्यांना मोठे केले, त्यातील काही जण निवडणुकीची हवा लागताच गद्दारी करीत आहेत, तर आपल्यातील काही अनाजी पंत घरभेदीपणा करीत आहेत. अशा अनाजी पंतांचा कडेलोट झालाच पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या मतदारसंघातील खुंटलेल्या विकासाला चालना देण्यासाठी महायुतीचा प्रतिनिधी विधानसभेत गेला पाहिजे. त्यासाठी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेण्याचे आवाहन महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी या वेळी केले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर यांनीही या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आरपीआयचे नरेंद्र गायकवाड, वाघमारे, भाजपचे तालुका अध्यक्ष बापू घारे, गोगटे, शिवसेनेचे नवीन घाटवळ, सहसंपर्क प्रमुख विजय पाटील, एस. एम. पाटील, उल्हास भुर्के, महिला संघटक सुरेखा खेडेकर, अनिता पाटील, प्रिया जाधव, रेश्मा आंग्रे, गोविंद बैलमारे, विश्वास चव्हाण, किरण भारस्कर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.