Breaking News

शुद्ध भगवा कोणाचा?

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणार्‍या बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना अजून दोन वर्षे अवकाश आहे. तरीही नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. सारे पक्ष झोपा काढत असतात किंवा सत्तेच्या उबेमुळे सुस्त पडलेले असतात, तेव्हा भाजपचा कार्यकर्ता शांतपणे कामाला लागलेला असतो याचे प्रत्यंतर मिळू लागले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा पाडाव करून मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर शुद्ध भगवा फडकवण्याचा इरादा बुधवारी झालेल्या भाजप मुंबई कार्यकारिणीच्या बैठकीत जाहीर करण्यात आला आहे.

शिवसेनेचा भगवा हा आता शुद्ध भगवा उरलेला नाही हे तर दिसतेच आहे. सत्तेच्या लालसेपायी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात शिरून शिवसेनेने आपले हिंदुत्व तर गमावलेच पण मुंबईकरांची देखील घोर निराशा केली. हिंदुत्वाचा शुद्ध भगवा आता फक्त भाजपच्याच खांद्यावर आहे. परंतु भाजप फक्त हिंदुत्वाचाच नव्हे तर विकासाचा झेंडा देखील खांद्यावर घेऊन वाटचाल करतो आहे हे सारा देश जाणतो. गेल्या चार दशकांहून अधिक काळ मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे राज्य आहे. या प्रदीर्घ काळात शिवसेनेने हे महानगर घडवले किती आणि बिघडवले किती हे प्रत्येक मुंबईकर ओळखून आहे. देशाच्या तिजोरीत सर्वाधिक कर भरणारे हे महानगर शिवसेनेने फक्त सोन्याची अंडी देणार्‍या कोंबडीप्रमाणे सांभाळले. बिचार्‍या कोंबडीला खाऊ-पिऊ घातले नाही तरी ती सोन्याचे एक अंडे रोज देणारच हे ठाऊक असलेल्या शिवसेनेने प्रत्यक्षात मुंबईकरांचा अंतच पाहिला. मुंबईत ज्या काही आधुनिक सोयीसुविधा निर्माण झाल्या, त्या सार्‍या भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि आता सक्रिय असलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच पुढाकाराने उभ्या राहिल्या हे विसरून कसे चालेल. नव्वदीच्या दशकाच्या उत्तरार्धात माननीय गडकरी यांच्या पुढाकाराने मुंबईमध्ये 55 उड्डाणपुलांचे बांधकाम सुरू झाले होते. त्यांची उद्घाटने पुढे काँग्रेसप्रणित सरकारने केली. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत कोस्टल रोड, मुंबई मेट्रो महाप्रकल्प, असंख्य उड्डाणपुलांची पुनर्उभारणी, मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग अशा असंख्य प्रकल्पांना चालना मिळाली. त्यांची उद्घाटने करण्याची वेळ सध्याच्या ठाकरे सरकारवर येणार नाही हे नक्की. कारण तीन डगमगत्या चाकांवर उभे असलेले हे बिघाडी सरकार अल्पावधीतच कोसळेल हे कुणीही सांगेल. स्वत:चे अस्तित्व, स्वत:चे स्वत्व आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी प्राणपणाने जपलेले हिंदुत्व या सार्‍या गोष्टींना नव्या शिवसेनेने तिलांजली दिलेली आहे ही बाब मुंबईकरांना अजिबात रुचलेली नाही. याचे फलित 2022 साली होणार्‍या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने दिसेल. भाजप हा शिस्तबद्धपणे काम करणारा व कार्यकर्त्यांची मोठी फळी पदरी असलेला प्रबळ पक्ष आहे. दोन वर्षे आधीपासूनच या पक्षाने मुंबई जिंकण्याच्या इराद्याने दंड थोपटले याचाच अर्थ शिवसेनेची मुंबईवरील मक्तेदारी संपुष्टात येण्याची तारीख निश्चित झाली आहे. भाजप येणार… मुंबई घडवणार – या आक्रमक घोषणेसह भाजपने रणशिंग फुंकल्यामुळे शिवेसेनेच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली असणार यात शंका नाही. मुंबई महापालिकेवर दोन वर्षांनंतर जो भगवा फडकत असेल तो शुद्ध तर असेलच आणि तो भारतीय जनता पक्षाचाच असेल ही काळ्या दगडावरची रेघ.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply