कळंबोली ः प्रतिनिधी
भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी (दि. 18) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कामगार नेते शिवाजी पाटील, माजी आमदार रमेश शेडगे, माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक अमर पाटील, नगरसेवक नितीन पाटील, संजय भोपी, राजेंद्र शर्मा, बबन मुकादम, हरेश केणी आदींसह कार्यकर्ते आणि माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, जीवनात माणसाने समाजाच्या कामी यायला हवे. यातीलच राजूशेठ बनकर एक होते. त्यांनी कोरोनाच्या संकटात आपला जीव धोक्यात घालून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा केली. ते सतत जनतेसाठी झटत राहिले. कोरोना साथीत त्यांचे स्वतःकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांना प्राण गमवावा लागला. एवढा मोठा दुखाचा डोंगर कोसळला असतानाही त्यांचे चिरंजीव सिद्धेश बनकर यांनी स्वतःला सावरून काम सुरूच ठेवले. सिद्धेश बनकर यांच्या पाठीशी आम्ही सर्व उभे राहून माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. माथाडी कामगारांना त्यांच्या हक्काचे कार्यालय मिळाले आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
नगरसेवक बबन मुकादम यांनी राजेंद्र बनकर यांच्या आठवणी जागृत करताना सांगितले, राजूशेठ बनकर यांनी आपले आयुष्य जनतेच्या सेवेसाठीच वेचले. कोरोना काळात गरीब, गरजू उपाशी राहू नयेत यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू ठेवले, पण हे काम करतानाच त्यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला. स्थायी समिती माजी सभापती नगरसेवक अमर पाटील यांच्या प्रयत्नाने माथाडी कामगारांचे हक्काचे कार्यालय कळंबोली महावीर प्लाझा येथे सुरू करण्यात आले आहे.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …